लाईन बाजार हॉकी मैदानात बसणार अत्याधुनिक टर्फ
महापालिका जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणार, ३ कोटी रुपये खर्च, टर्फ बसवण्यासाठी लागणाऱ्या बेसचे काम पूर्ण
कोल्हापूरः संग्राम काटकर
ब्रिटीश काळापासून कसबा बावड्यातील लाईन बाजारात असलेल्या मातीच्या हॉकी मैदानाचा आता चेहरा मोहरा बदलणार आहे. मैदानात महापालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक बनावटीचे ३ कोटी रूपयांचे टर्फ बसवले जाणार आहे. अलीकडेच मैदानात दोन प्रकारच्या खडी व डांबरीकरणाचा थर केला आहे. या थरावर अत्याधुनिक टर्फ बसवले जाणार आहे. थायलंडमधील तीन कंपन्यांकडून महापालिका टर्फचे कोटेशन मागवणार आहे. टर्फ बसवण्यास लागणारी प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्तावही पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळल्यानंतर टेंडर काढून मैदानात टर्फ बसवण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमनंतर आता लाईन बाजार हॉकी मैदान हे दुसरे टर्फ मैदान म्हणून नावारुपाला येणार तर आहेच, शिवाय या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधीही मिळवता येणार आहे.
कसबा बावड्यातील लाईन बाजार परिसरात इंग्रजांच्या काळापासूनच हॉकी हा खेळ रुजल्याने येथे घरटी हॉकीपटू असणे स्वाभाविक आहे. इतकेच नव्हे छोट्या लाईन बझारात हॉकीचे तब्बल १२ संघ आहेत. आणि याच छोट्या लाईन बाजारात इंग्रजाच्या काळात हॉकी मैदान आहे. हे पूर्णपणे मातीचे. या मातीच्या मैदानात सर्व संघांनी फार पूर्वीपासून हॉकीचा सराव राज्यभरातील संघांना टक्कर देण्याची धमक दाखवून दिली आहे. शेकडो खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा संघातून आणि पंचवीसहून अधिक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्र संघातून खेळल्या आहेत. काळ जसा बदलला तसा टर्फ मैदानाची गरज भासू लागली. ही गरज पूर्ण करण्यासाठी १९९७ साली मातीच्या मैदानात टर्फ बसवण्याची मागणी संघांनी पुढाकार घेतला. परंतू या ना त्या कारणांनी टर्फ बसवण्याचे काम बारगळत राहिले. गतवर्षी मात्र खेळाडूंनी मैदानात टर्फ बसवायच्चेच असा चंग बांधला. त्यानुसार नेते मंडळींकडे पाठपुरावाही सुरू केला.
माजी नगरसेवक व सत्यजित कदम यांनी खेळाडूंच्या मागणीला मनावर घेतले. त्यांनी महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधा पुरवणे या योजनेतून लाईन बाजार हॉकी मैदानात टर्फ बसवण्यासाठी शासनाच्या नगरविकास खात्याकडे निधीची मागणी केली. त्यानुसार खात्याने पहिल्या टप्प्यात दीड कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. टप्प्याटप्प्याने मिळत राहिलेल्या पैशातून महापालिकेने गतवर्षापासून टर्फ बसण्यासाठीचा बेस करायला सुरुवात केली. मैदानात दोन प्रकारच्या खडी, डांबरीकरणाचा थर ही बसवला. या थरावर आता लवकरच रबरचा थर करण्यात येणार आहे. हा थर पूर्ण झाला की रबरच्या थरावर टर्फ बसवले जाणार आहे.
हॉकी मैदानासाठी ९४ मीटर लांब आणि ५५ मीटर रुंद असा आकार असणे आवश्यक असते. परंतू लाईन बाजार हॉकी मैदान हे मुळातच थोडे लहान असल्याने मैदानालगतची बैठक व्यवस्था हटवून मैदान ९४ मीटर लांब आणि ५५ मीटर रुंद इतक्या आकाराचे केले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून मैदानाच्या भोवतीने दीड फुट रुंदीचे गटार केले आहे. तसेच मैदानामध्येही अंडर ग्राउंड गटारी केल्या आहेत. आता मैदानात टर्फ बसवण्यासाठी नगरविकास खात्याकडूनच तीन कोटी रुपयांच्या निधी महापालिका मिळवणार आहे. या निधीतून टर्फ बसवण्याचे केले जाईल, असे महापालिका सुत्रांनी सांगितले.
खेळाडूंचे स्वप्न सत्यात येईल...
देशात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा ह्या टर्फ मैदानात होता. परंतू लाईन कोल्हापुरात टर्फ मैदान नसल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा खेळण्याची धमक असून या स्पर्धेपर्यंत खेळाडूंना जाता येत नाही. ही उणिव भरुन काढण्यासाठी हॉकीपटूंनी २८ वर्षांपूर्वी लाईन बाजार हॉकी मैदानात टर्फ बसवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सत्यात येत आहे.