प्रगत तंत्रज्ञान, तरीही फाटक दुरुस्त होईना !
चिपळूण :
जागतिक स्तरावर आपले प्रगत तंत्रज्ञान पोहचवत अभिमानाने मिरवणाऱ्या कोकण रेल्वेला चिपळूण रेल्वेस्थानकापासून जवळच असलेले कळंबस्ते येथील रेल्वे फाटक दुरुस्त होईनासे झाले आहे. 22 फेब्रुवारीनंतर 4 मार्चला कळंबस्ते येथील रेल्वे फाटक तांत्रिक बिघाडामुळे न पडल्याने ‘मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’ काही काळ थांबवावी लागली. वास्तविक 12 दिवसांपूर्वी दुरुस्ती होऊनही पुन्हा बिघाड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण रेल्वे स्टेशनच्या नजीक कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. येथे ओव्हरब्रीज बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र या मागणीला अजून तरी यश आलेले नाही. परिणामी या मार्गावर धावणाऱ्या प्रत्येक गाडीच्यावेळी फाटक पडल्यानंतर 10 ते 20 मिनिटे मार्ग बंद होतो. परिणामी लोकांची, वाहनचालकांची गैरसोय होते. 22 फेब्रुवारीला सायंकाळी तांत्रिक अडचणीमुळे खाली आलेले गेट पूर्णत: लॉक झाले नाही. अशा स्थितीत गेट लॉक न झाल्यास गेटपासून काही अंतरावर असलेले सिग्नल कार्यान्वित होतात. याच पद्धतीने सिग्नल कार्यान्वित झाले आणि गेटपासून सुरक्षित अंतराच्या आधीच वंदे भारत ट्रेन थांबली. गेटमनने मग पायलटिंग करत संथगतीने वंदे भारत ट्रेन पास केली असल्याचा प्रकार त्यावेळी घडला होता. तसाच प्रकार मंगळवारी सायंकाळी या फाटकावर पुन्हा घडला.
मुळातच 22 फेब्रुवारीला घडलेल्या या प्रकारानंतर कोकण रेल्वेकडून या फाटकातील तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र अवघ्या बाराच दिवसात पुन्हा तसाच प्रकार घडल्याने करण्यात आलेल्या दुरुस्तीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुळातच आपल्या प्रगत तंत्रज्ञानात एक पाऊल पुढे असणाऱ्या कोकण रेल्वेला आपल्या एका फाटकातील बिघाड दुरुस्त होत नाही आणि दुरुस्ती केल्यानंतर बारा दिवसात पुन्हा तसाच बिघाड होतो, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे. रेल्वे फाटक न पडल्याने कोणताही अनर्थ घडत नाही. तांत्रिक अडचणी आल्या तरी पर्यायी व्यवस्था भरभक्कम असल्याचे कोकण रेल्वे सांगत असली तरी एखाद्या बिघाडाची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बिघाड होतो, हेच अनाकलनीय असल्याच्या प्रतिक्रिया चिपळुणात सर्वत्र उमटत आहेत.
- आणखी एक कर्मचारी नियुक्त करावा!
मुळातच दहा-बारा दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाला, तो दुरुस्त झाला. दररोज कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ दुरुस्ती सुरू आहे. तरीही पुन्हा पुन्हा तांत्रिक बिघाड होत असेल तर नेमकी दुरुस्ती किती गांभीर्याने घेतली जाते. हे नेहमीच होणार असेल तर फाटकाजवळ आणखी एक कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
- ...तर दोषींवर कारवाई - शैलेश बापट
कळंबस्ते फाटक बिघाडाचा प्रकार दहा-पंधरा दिवसांपूर्वी घडल्यानंतर तांत्रिक बिघाडाची तत्काळ दुरुस्ती करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी पुन्हा तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे दुरुस्तीनंतरही घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत आम्ही चौकशी करत आहोत. यामध्ये दुरुस्तीमध्ये हलगर्जीपणा दिसून आला तर दोषींवर कारवाई केली जाईल, असे कोकण रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट यांनी सांगितले.