अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. सुभाष पुराणिक यांची निवड
ओटवणे प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवृत्त वन संरक्षक ॲड. सुभाष पुराणिक यांची एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा शाखेच्या पुनर्बांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.कै बिंदुमाधव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली १९७४ मध्ये दिल्ली येथे नोंदणीकृत 'अखिल भारतीय ग्राहक पंचायत ' स्थापन करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९९८ पुर्वीपासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यरत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि सर्व तालुक्या शाखेच्या कार्यकारीणीतील पदाधिकाऱी आणि सदस्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी सावंतवाडीत श्रीराम वाचन मंदिर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. नेहा जोशी, कोकण प्रांत सहसचिव प्रा सुभाष गोवेकर, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, सचिव दीपक पटेकर, समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, संदीप टोपले, चेतन वाळके, बाळासाहेब बोर्डेकर, समीर शिंदे, मनोज घाटकर, अस्लम खतिब, जयराम वायंगणकर, शैलेश कुडतरकर, विजय ओटवणेकर, तुकाराम म्हापसेकर, दत्ताराम सडेकर, परशुराम चव्हाण, अमोल केसरकर आदी सदस्य उपस्थित होते.यावेळी उपस्थित ग्राहक सदस्यांना मार्गदर्शन करताना सौ नेहा जोशी यांनी, व्यावहारिक जीवनात वावरताना बोकाळलेली व्यवस्था उदाहरणार्थ - खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून अंमलात आणल्या जाणार्या अनिष्ट प्रथा - उदाहरणार्थ अवाजवी नफा मिळवण्याचे हेतूने बेकायदेशीरपणे चुकीची वजन- मापे वापरण्याबरोबर भरमसाठ किंमत आकारणे, काळाबाजार, कृत्रिम टंचाई, अन्न पदार्थातील अनारोग्यास कारणीभूत ठरणारी भेसळ इत्यादींबाबत होणारी फसवणूक, पिळवणूक, खासगी संस्थां, अनेक शासकीय विभाग, स्वराज्य संस्थांमधील केला जाणारा अन्याय, दिरंगाई, भ्रष्टाचार इत्यादींबाबत, जीवनशैली-आर्थिक घडी विस्कटली जावू नये आणि सर्वानाच आनंदात आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी, तटस्थ भूमिकेतून अन्याय, अत्याचारांविरुद्ध, संयम राखून कायदेशीर मार्गाने झटणाऱ्या, ईच्छाशक्ती असणाऱ्यांनी, खंबीरपणे, जिद्दीने कार्य करण्याची तळमळ असणाऱ्यांनी संघटित होऊन कार्य करण्याची केवळ गरज नव्हे तर अत्यावश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष पुराणिक यांनी या पदावर निवड केल्याबद्दल उपस्थितांचे आभार म्हणून लवकरच जिल्हा कार्यकारणीसह सर्व तालुका कार्यकारणी निवडण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच "जागो ग्राहक जागो" या ब्रीद वाक्यानुसार ग्राहकांनी जागृत व्हा, संघटित व्हा असे आवाहन केले. यावेळी प्रा. सुभाष गोवेकर यांनी अखिल भारतीय ग्राहक संघटनेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्राहक पंचायत विस्तार करून तालुकावार शाखा स्थापन करून ग्राहक पंचायत संघटनेचा विस्तार करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनीही मार्गदर्शन केले.