For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलगावच्या अँड. शीतल टिळवे यांना डॉक्टरेट प्रदान

कोलगावच्या अँड  शीतल टिळवे यांना डॉक्टरेट प्रदान
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : सावंतवाडी नजीक कोलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व अनुभवी विधिज्ञ अँड शीतल अभिजीत टिळवे यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात सेज विद्यापीठामार्फत कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
अँड शीतल टिळवे यांनी विद्यापीठाच्या विधी व कायदेविषयक अध्ययन शाखेअंतर्गत कायदेविषयात पीएचडीचे संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांमधील 'बाल दत्तक प्रक्रियेचा तुलनात्मक अभ्यास' असा होता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील बाल दत्तक कायदे, प्रक्रिया, अंमलबजावणीतील अडचणी, तसेच दत्तक घेतलेल्या मुलांचे हक्क, संरक्षण आणि पुनर्वसन या बाबींचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनात मांडला.

Advertisement

यात दत्तक प्रक्रियेवर परिणाम करणारे सामाजिक, कायदेशीर, प्रशासकीय आणि सांस्कृतिक घटक तसेच अनाथ व बेघर मुलांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध धोरणांचा सखोल विचार करण्यात आला आहे. संशोधनातून दत्तक प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि बालकेंद्रित बनवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच इच्छुक पालकांसाठी समुपदेशन, कायदेशीर सहाय्य आणि पाठपुरावा व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.

अँड शीतल टिळवे यांच्या पीएचडी संशोधनासाठी डॉ. सिमरन सिंग यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावली. तसेच विभागप्रमुख डॉ. सुनील कुमार पांडे यांच्या मार्गदर्शन व शैक्षणिक परीक्षणातून या संशोधनाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार त्यांच्या पीएचडीच्या अंतिम मुलाखतीचा टप्पा नुकताच दिनांक 18 जुलै 2026 रोजी पार पडला असून विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवीसाठी दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी पात्र घोषित केले आहे.

Advertisement

कायदा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अँड शीतल टिळवे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सामाजिक व शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अँड शीतल टिळवे यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कायदा, शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक व कायदेविषयक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :

.