ओटवणेची सुकन्या ॲड .गौरी राऊळ होणार न्यायाधीश
एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात ३४ वी
ओटवणे प्रतिनिधी
मुळची ओटवणे गावची सुकन्या आणि सध्या पुणे येथे राहत असलेली ॲड. कु गौरी श्याम राऊळ एमपीएससीच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परीक्षेत राज्यात ३४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या प्रशिक्षण काळानंतर लवकरच ती न्यायाधीश बनणार आहे. ॲड. कु गौरीचे हे यश तिच्या कुटुंबीयांसह ओटवणेवासियांसाठी अभिमानास्पद आहे.ओटवणे करळगाळूवाडी येथील श्याम राऊळ आणि त्यांचे भाऊ कृष्णा आणि रवींद्र राऊळ पुण्यातच नोकरी निमित्त राहतात. त्यामुळे ॲड. गौरी राऊळ हिचे बालपण पुण्यातच गेले. श्याम राऊळ यांनी प्रतिकूल परिस्थितीत नोकरीसाठी पुणे गाठल्यानंतर आपल्या तिन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. मोठी मुलगी स्वाती हिला डीएडचे शिक्षण देऊन तिला शिक्षिका बनवले तर मुलगा विजय एका खाजगी कंपनीत अकाउंट मॅनेजर आहे. गौरी राऊळ हिने १२ वीत विज्ञान शाखेपर्यंतचे शिक्षण पुण्यातच घेतल्यानंतर पुणे विद्यापिठातून मधून एल. एल. बी. नंतर एल. एल. एम. हे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर ॲड गौरी राऊळ हिने पाच वर्षे वकिली करीत असतानाच एमपीएससी च्या "प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी" परीक्षेचा अभ्यास केला. या परीक्षेला महाराष्ट्रातून ११४० विद्यार्थी बसले होते. त्यात अँड गौरी राऊळ ही ३४ क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यासाठी तिला न्याय क्षेत्रातील मान्यवरांसह आई सौ वैशाली तिचे नेहमीच प्रोत्साहन मिळाले. न्यायाधीश झाल्याने राऊळ कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ॲड. गौरी राऊळ हिने आपल्या वडिलांच्या मेहनतीचे चीज करून ओटवणे गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. निश्चित ध्येय आणि त्या दृष्टीने अथक परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ॲड. गौरी राऊळ एमपीएससी न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण झाली. 'प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी' परीक्षेत उत्तीर्ण होत अँड गौरी राऊळ हिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आई-वडिलांचे कष्ट, अपार मेहनत, सातत्य आणि संयम यांच्या जोरावरॲड. गौरी राऊळ हिने हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. तसेच यासाठी तिचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात राहत असलेल्या ॲड. गौरी राऊळ असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी स्वतः तिच्या घरी जाऊन अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंपरी-चिंचवड वकील संघटनेचे सदस्य अँड. मंगेश खराबे उपस्थित होते. तसेच ओटवणेवासियांसह पुण्यात विविध क्षेत्रातून अँड गौरी राऊळ अभिनंदन होत आहे.