ॲड. देवदत्त परूळेकर अष्टपैलू समाजसेवक' पुरस्काराने सन्मानित
जागरूक बनून वाम मार्गाला जाणाऱ्या मुलाना रोखले पाहिजे : परुळेकर
आचरा येथे लवकरच सेवांगणची शाखा सुरु होणार
आचरा प्रतिनिधी
आचरा येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था आचरा यांची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मंदार सांबारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी वैभवशाली पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. श्रीकांत सांबारी यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी सन २०२३ पासून संस्थेतर्फे 'कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक' पुरस्कार' देण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार वेंगुर्ला येथील प्रसिद्ध साहित्यिक, प्रवचनकार अॅड. देवदत्त परूळेकर यांना अध्यक्ष सांबारी यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह शाल, श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रीमती वैशाली सांबारी, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश हडकर, राजन पांगे, लक्ष्मण आचरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, वामन आचरेकर, संतोष गावकर, पांडूरंग वायंगणकर, दिलीप कावले, कर सल्लागार सी. जी. कुबल, हेमांगी खोत, रागिणी ढेकणे आदी उपस्थित होते.
जागरूक पालक बनून वाम मार्गाला जाणाऱ्या मुलाना रोखले पाहिजे
सत्काराला उत्तर देताना अॅड. देवदत्त परूळेकर म्हणाले की व्यसनाधीन आणि वाममार्गाकडे धावणाऱ्या युवा पिढीला पाहून वाईट वाटते. शाळा, महाविद्यालयातील मुलांच्याही हातात पैसे खेळत आहे. हातात असलेला पैसे कुठे खर्ची घालावा, बचत कशी करावी, याचे कोणतेच नियोजन तरुण पिढीकडे नसते. अल्पवयीन मुलेही व्यसनांच्या आहारी गेली असून प्रत्येक पालकांनी किंबहुना समाजाने जागरूक बनून वाममार्गाला जाणाऱ्या मुलांना रोखायला पाहिजे, असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांनी केले.
आचरा येथे लवकरच सेवांगणची शाखा
सार्वजनिक क्षेत्रात वावरताना माणसाचे चारित्र्य स्वच्छ असायला पाहिजे. यातून एखादी संस्था जोमाने वाढते. सेवांगणची अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यापासून आमच्या संस्थेकडे एक कोटी रुपयेपेक्षा जास्त शिल्लक आहेत. आचरा येथे बॅ. नाथ पै सेवांगणची शाखा सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे. मला पुरस्काराप्रती मिळालेली रक्कम सेवांगणच्या सेवाकार्यासाठीच खर्च करण्यात येईल, असे अॅड. परूळेकर यांनी सांगितले.