बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. बी. जे. गंगाई
20 निवडणुकीत चुरशीने मतदान : उपाध्यक्षपदी अॅड. पवन पाटील, अॅड. जयश्री मंड्रोळी : विजयी उमेदवारांसह समर्थकांचा जल्लोष
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या बेळगाव बार असोसिएशनची निवडणुकीसाठी शनिवारी चुरशीने मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीत मातब्बर वकील नेते रिंगणात उतरले होते. यामध्ये अॅड. बी. जे. गंगाई हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. 604 मते मिळवत अॅड. बी. जे. गंगाई यांनी एकतर्फी विजय मिळविला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवन पाटील, जयश्री मंड्रोळी यांनी विजयी पटकाविला. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा मोठ्या उत्साहात आणि चुरशीने मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर वकिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून विविध पदांसाठी उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली होती. निवडणुकीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार तसेच कार्यकारिणी सदस्य अशा महत्त्वाच्या पदांसाठी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ओळखपत्रांची तपासणी करूनच मतदारांना प्रवेश देण्यात आला. तसेच मतदान प्रक्रिया पारदर्शक रहावी यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून काटेकोर नियोजन करण्यात आले होते.
यंदाच्या निवडणुकीत अनुभवी वकिलांसोबतच नवोदित उमेदवारांनीही जोरदार प्रचार केला होता. न्यायालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा जोर वाढला होता. विविध गटांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मतदानाला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा ओघ कायम राहिला. अनेक वरिष्ठ वकिलांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविला. तऊण वकिलांमध्येही मतदानाबाबत उत्साह दिसून आला.
सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांचे मत पेटीबंद झाले. सायंकाळी 6.45 च्या सुमारास मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणी जसजशी पुढे जात होती तशी उमेदवारांची धाकधुक वाढत होती. टप्प्याटप्प्याने निकाला हाती येत होते. तसे विजयी उमेदवारांचे समर्थक गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजीही करत होते. संपूर्ण निकाल 10.45 च्या सुमारास होती लागला. निवडणूक शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली. निवडणूक काळात शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.