For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रौढ इसमाला छंद

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रौढ इसमाला छंद
Advertisement

मुलांना वेगवेगळ्या गोष्टी जमविण्याचा छंद असतो. कुणी जुनी नाणी जमवितो, तर कुणी माचिसचे डबे, वय वाढण्यासह छंदही कमी होत जातात. परंतु एका इसमाला मुलांप्रमाणे स्नो-ग्लोब जमविण्याचा छंद जडला असून यातून त्याने स्वत:च्या नावावर विश्वविक्रमही केला आहे. जर्मनीतील जोसेफ कार्डिनलसाठी जणू वर्षभर सणच साजरा होत असतो. स्नो ग्लोब म्हणजेच काचेच्या गोळ्याच्या आत वसलेल्या बर्फाळ जगताबद्दल त्याचे प्रेम इतके दृढ आहे की त्याच्याकडे जगातील सर्वात मोठा स्नो ग्लोब कलेक्शन आहे. कार्डिनलकडे एकूण 11,017 स्नो ग्लोब आहेत, जे त्याला या अनोख्या छंदासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड धारकाचा मान मिळवून देतात.

Advertisement

1984 पासून प्रवास सुरू

जोसेफ कार्डिनलने स्नो ग्लोब एकत्र करण्याची सुरुवात 1984 मध्ये केली होती. प्रारंभी हा केवळ एक छंद होता, परंतु कालौघात हा ध्यासात बदलला. 2002 साली त्याने पहिल्यांदा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. तेव्हा त्याच्याकडे केवळ  6,100 स्नो ग्लोब होते, त्यानंतर त्याने न थांबता मागील दोन दशकांमध्ये हा संग्रह जवळपास दुप्पट केला आहे. आज हा अनोखा संग्रह जर्मनीच्या नूर्नबर्ग येथील त्याच्या घराच्या बेसमेंटमध्ये जोपासण्यात आला आहे. पूर्ण बेसमेंट जणू बर्फाळ कल्पनांचे जगच ठरले आहे. जेथे प्रत्येक ग्लोब स्वत:च्या आत एक वेगळी कहाणी सामावून आहे.

Advertisement

हार्ले-डेव्हिडसनपासून टायटॅनिकपर्यंत

जोसेफच्या कलेक्शनमध्ये केवळ पारंपरिक ख्रिसमस किंवा विंटर थीमचे स्नो ग्लोब नसून अत्यंत अनोखी आणि विचित्र डिझाइन्सही सामील आहेत. त्याच्याकडे एक हार्ले-डेव्हिडसन थीमचा स्नो ग्लोब असून जो हलविल्यावर मोटरसायकलचा आवाज येतो. तर अन्य एका स्नो ग्लोबमध्ये टायटॅनिक जहाजाची प्रतिकृती आहे, जी बर्फादरम्यान बुडताना दिसून येते. प्रत्येक स्नो ग्लोब स्वत:च एक छोटेसे जग आहे, जे कल्पना आणि रोमान्साने भरलेले असते असे कार्डिनलचे सांगणे आहे. जोसेफचा सर्वात जुना स्नो ग्लोब 1889 मधील असून तो पॅरिस येथे निर्माण करण्यात आला होता. या ग्लोबमध्ये आयफेल टॉवरची आकृती आहे, जी इतिहासाची एक झलक सादर करते. तर त्याच्याकडे जगातील सर्वात छोटा स्नो ग्लोब देखील असून तो नखाच्या आकाराचा आहे. हा इतका छोटा आहे की तो पिनाच्या स्वरुपातही वापरला जाऊ शकतो.

Advertisement
Tags :

.