विद्युत वाहिनीच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू
कुडाळ -
तुटून पडलेल्या विद्युत भारीत वाहिनीचा स्पर्श होऊन झाराप - कुंभारवाडी येथील राहिवासी व गिरण व्यावसायिक प्रताप उर्फ बाळा वासुदेव कुडाळकर ( 60 ) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरापासून काही अंतरावर देवपूजेसाठी लागणारी फुले काढण्यासाठी ते गेले असताना घडली. ऐन गणेश चतुर्थी सणात त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. प्रताप कुडाळकर नेहमी देवाला लागणारी फुले काढण्यासाठी ते घराच्या मागच्या बाजूला जायचे. आज सकाळी फुले काढण्यासाठी ते घरातून बाहेर पडले. शेतातील पायवाटेने ते जात असताना तुटून पडलेल्या विद्युत भारीत वाहिनीला त्यांचा स्पर्श झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना समजताच ग्रामस्थानी तेथे धाव घेतली. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कुडाळकर शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी ( साळगाव ) संचालक पदावर ते कार्यरत होते. तसेच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा.या घटनेने झाराप दशक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.