Ratnagiri Crime | वेरूळ येथे प्रौढावर कोयत्याने हल्ला
05:15 PM Jun 05, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
वेरूळ बसस्टॉप येथे पूर्ववैमनस्यातून कोयत्याने हल्ला
लांजा : तालुक्यातील वेरूळ बसस्टॉप येथे पूर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या हल्ल्यात प्रभाकर उर्फ भाई बाबू जाधव (५९, रा. वेरूळ बौद्धवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर संशयित जनार्दन गौतम जाधव (३५, रा. वेरूळ बौद्धवाडी) पसार झाला आहे. लांजा पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रभाकर जाधव आणि संशयित जनार्दन जाधव यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू आहे. बुधवारी सायंकाळी प्रभाकर हे वेरूळ बसस्टॉप परिसरात टीव्ही रिचार्ज करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जनार्दन जाधवने जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपीने कोयत्याने प्रभाकर यांच्या हातावर, कपाळावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात प्रभाकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले.
दरम्यान, हल्ल्यानंतर जनार्दन घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी प्रभाकर जाधव यांच्या पत्नी भारती जाधव (५२) यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलिसात गुन्हा दाखल केला.