कुपोषित मुलांना पुनर्वसन केंद्रात दाखल करा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : बालविकास संबंधित विभागांची आढावा बैठक
बेळगाव : कुपोषित मुलांना जिल्हा व तालुका पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (एनआरसी) दाखल करून त्यांना योग्य उपचार देण्यात यावेत. जिल्ह्यातील सर्व बालविकास योजना अधिकाऱ्यांनी तीव्र कुपोषित मुलांची ओळख करून त्यांना पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करावे. त्यांचे योगरित्या पालनपोषण करण्यासाठी पावले उचलण्याची सूचना जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. जि. पं. सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बालविकास संबंधित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले, शाळा व अंगणवाडी केंद्रातील मुलांना चांगल्या दर्जाच्या अन्नाचा पुरवठा करावा. बाल वसतिगृहातील मुलांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलावीत. वसतिगृह चालकांनी मुलांना कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत, यादृष्टीने कार्य करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.
शाळा व अंगणवाडी सोडलेल्या मुलांना ओळख पटवून त्यांना पुन्हा शालेय जीवनात येण्यासाठी प्रोत्साहित करावे. नियमित एसडीएमसी व पालक सभा घेऊन समुपदेशनाद्वारे मुलांना मानसिकदृष्ट्या बळकट बनविले पाहिजे. बालविवाह रोखण्यासाठी सर्व जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी मोहीम राबवावी. ग्रामसभा, प्रभागसभा, महिलासभा, बालसभा सक्तीने घ्याव्यात. वसतिगृहांमध्ये समित्यांची स्थापना करावी. वसतिगृहांमधील छतावरील पंखे भिंतीवर बसवावेत, अशा सूचना शिंदे यांनी केल्या. यावेळी जि. पं. प्रकल्प संचालक रवी बंगारेप्पन्नवर, महिला व बालविकास खात्याचे उपसंचालक चेतनकुमार एम. एन., जिल्हा प्रकल्प अधिकारी अण्णाप्पा हेगडे, महिला व बालविकास अधिकारी कांचन आमठे, बालसंरक्षण अधिकारी परवीन, अपंग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.