लय भारी निर्णय!, ZP शाळेत अॅडमिशन घेतल्यास घरफाळा माफ होणार, ग्रामपंचायतीचा निर्णय
यंदाच्या झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे
कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रयाग चिखली येथील ग्रामपंचायतने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. सरपंच रोहित पाटील व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकमताने घेतलेल्या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित केल्यास त्यांचा चालू वर्षाचा घरफाळा माफ केला जाणार आहे. यंदाच्या झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय गावातील जे ग्रामस्थ आपल्या वृद्धा आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत त्यांना ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची मदत किंवा त्यांना वारसा हक्क न देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. प्रयाग चिखली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अर्जुन पाटील यांनी 'तरुण भारत'ला ही माहिती दिली. त्यामुळे प्रयाग चिखली ग्रामपंचायतीच्या या दोन्ही निर्णयांची चर्चा सुरु आहे.
या निर्णयाची तरतूद कशी केली जाणार यावर उपसरपंच पाटील म्हणाले, शासनाकडून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना मिळणाऱ्या मानधनातून या खर्चाची तरतूद केली जाणार आहे. आम्ही ग्रामपंचायतला मानधन अदा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुठे कमी पडेल तिथे स्वखर्चही करण्याची तयारी सदस्यांनी दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या ग्रामपंचायतीने 100 टक्के प्रवेश निश्चित करण्याचा निर्धार केला आहे. शाहू महाराज यांनी जिल्ह्यातील पहिली शाळाप्रयाग चिखली येथे चालू केली. त्या शाळेचे संवर्धन होण्यासाठी आम्ही हा एक लहानसा प्रयत्न करत आहोत. शंभर टक्के आमचा कार्यकाळ असेपर्यंत शंभर टक्के यासाठी प्रयत्न करणार असंही उपसरपंच पाटील यांनी स्पष्ट केले.