आयुर्वेद विज्ञान कोर्ससाठी दहावीनंतर मिळणार प्रवेश
‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन’ची योजना : 7.5 वर्षांचा कोर्स
बेळगाव : राज्यात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आज अनेक तरुण पुढे येत आहेत. त्यामुळे बारावी शिक्षण पूर्ण करून वैद्यकीयसाठी तरुण जागा मिळवत आहेत. एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला नाही तरी आयुर्वेद किंवा इतर भारतीय वैद्य पद्धतीच्या अभ्यासासाठी अनेकजण उत्सुक असतात. आता वैद्यकीय शिक्षण विभागाने महत्त्वाकांक्षी तरुणांसाठी सुवर्णसंधी मिळवून दिली आहे. भारतीय वैद्यकीय पद्धतीच्या ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन’ (एनसीआयएसएम) एसएसएलसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदवीसाठी प्रवेश देण्याची संधी मिळवून दिली आहे.
प्रवेशासंबंधी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीसंबंधी तक्रारी असल्यास दाखल करण्याचे आवाहन शिक्षणतज्ञ, शिक्षण संस्थांना, भारतीय वैद्यपद्धती, राष्ट्रीय आयोगाने केले होते. आता ही नियमावली आयोगाने नियमित करून अधिसूचना जारी केली आहे. प्रि-आयुर्वेद प्रोग्रॅम फॉर आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी रेग्युलेशन-2024 नावाने ही नियमावली ओळखली जात आहे. या पद्धतीमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयुर्वेद विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी 7.5 वर्षे सक्तीची केली आहेत. त्यातील पहिली दोन वर्षे प्रि-आयुर्वेद प्रोग्रॅम (पीएपी) त्यानंतरची पुढील चार वर्षे बीएएमएस पदवी, त्यानंतरचे एक वर्ष इंटर्नशीप सक्तीची केली आहे.
नूतन प्रवेशपरीक्षेचे धोरण
विद्यमान भारतीय वैद्यपद्धती आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी (आयुष) पदवी कोर्ससाठी ‘नीट’द्वारे प्रवेश देण्यात येत असतो. मात्र, आयुर्वेदपूर्व कोर्ससाठी ‘नीट-पीएपी’ (प्रि-आयुर्वेद प्रोग्रॅम) पूर्ण करणे गरजेचे आहे. या कोर्समध्ये प्रवेशासाठी निर्धारित गुण निश्चित करण्यात आले आहेत.
जागा वाटपासाठी केंद्रीय कौन्सिलिंग होणार
सामान्य वर्गातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 50 टक्के, अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे. ‘नीट-पीएपी’मध्ये मिळविलेल्या गुणांनुसार अखिल भारतीय मेरिट लिस्ट जाहीर करून त्याआधारे प्रवेश देण्यात येणार आहे. जागा वाटपासाठी केंद्रीय कौन्सिलिंग होणार आहे, असे नियमावलीमध्ये म्हटले आहे. परीक्षा संस्कृत व इतर भारतीय भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.
कोर्समध्ये संस्कृत शिकणे बंधनकारक
परीक्षेसाठी संस्कृतबरोबरच इंग्लिश, हिंदी किंवा संविधानाकडून मान्यता मिळालेल्या इतर कोणत्याही भाषेमध्ये अभ्यासक्रम असेल. पहिल्या वर्षात आठ प्रमुख विषय, दुसऱ्या वर्षात सात विषय असतील. पण या कोर्समध्ये संस्कृत शिकणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर इंग्लिश किंवा भारतीय भाषा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित हे विषय शिकविण्यात येणार आहेत. याच्या जोडीला भारतीय दर्शन व शास्त्र आणि दुसऱ्या वर्षात आयुर्वेदाचा परिचय करून देण्यात येणार आहे. याशिवाय पाच ऐच्छिक कोर्स ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होणे, यासाठी प्रत्येक विषयाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.