अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन आता नवे नौदलप्रमुख
पदभार स्वीकारला : लढाऊ क्षमता वाढवण्यावर भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांनी रविवार, 31 मे रोजी भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना साऊथ ब्लॉक संकुलात औपचारिक मानवंदना देण्यात आली. ते आता भारतीय नौदलाचे 27 वे नौदल प्रमुख बनले. दरम्यान, निवृत्त नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. अॅडमिरल त्रिपाठी 31 मे रोजी सेवेतून निवृत्त झाले.
अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन 1 जुलै 1987 रोजी भारतीय नौदलात अधिकारी म्हणून दाखल झाले होते. ते दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीमधील तज्ञ मानले जातात. त्यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ब्रिटनमधील जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, करंजा येथील कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर आणि अमेरिकेतील न्यूपोर्ट नेव्हल वॉर कॉलेजमधून उच्च शिक्षणही घेतलेले आहे.
पदभार स्वीकारताना अॅडमिरल स्वामिनाथन यांनी ही नवीन जबाबदारी स्वीकारताना आपला अभिमान आणि जबाबदारी व्यक्त केली. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने या पदासाठी केलेली निवड हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आणि सौभाग्य असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदल नेहमीच सतर्क आणि सज्ज राहील, असे नवीन नौदल प्रमुखांनी सांगितले. सध्याचे प्रादेशिक सुरक्षा वातावरण आव्हानात्मक, गुंतागुंतीचे आणि अनिश्चित आहे. भारतीय नौदलाची ऑपरेशनल सज्जता आणि लढाऊ क्षमता सर्वोच्च स्तरावर राखणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असेल. यामुळे देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांचे प्रभावीपणे संरक्षण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.