बेळगाव तालुक्यातील 54 ग्रा. पं.वर प्रशासकराज
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा आदेश : निवडणूक होईपर्यंत प्रशासकांची नियुक्ती : लवकरच पदभार स्वीकारणार
बेळगाव : ग्रामविकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. बेळगाव तालुक्मयातील एकूण 54 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज कायदा, 1993 मधील कलम 8(ग्ग्ग्) चा वापर करून आदेश देण्यात आला आहे. संविधानाच्या कलम 243-ई उपनियम तसेच कर्नाटक ग्रामस्वराज आणि पंचायतराज अधिनियम 1993 मधील कलम 41 आणि 42 मधील तरतुदींनुसार, ग्रामपंचायतींसह पंचायत राज संस्थांच्या सदस्यांचा कार्यकाळ त्यांच्या पहिल्या बैठकीसाठी निश्चित केलेल्या तारखेपासून पाच वर्षांचा असतो. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीचा कार्यकाळ समाप्त होतो. यानंतर पुन्हा निवडणुका घेऊन त्याठिकाणी अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यात येते. यानंतर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पुढील पाच वर्षांसाठी सुरू होतो.
यापूर्वी 2020 ते 2025 या पाच वर्षांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 2026 मधील जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व पुढील काही महिन्यांत विविध तारखांना समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर, लोकप्रतिनिधी नसलेल्या स्थितीत ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था लागू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे, नागरी सुविधा व प्रशासकीय निर्णय प्रक्रिया ठप्प होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. 2026 ते 31 या पाच वर्षांसाठी बेळगाव तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. तोपर्यंत प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. हा आदेश पुढील आदेश येईपर्यंत किंवा संबंधित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड होईपर्यंत लागू करण्यात आला आहे.
नियुक्त करण्यात आलेले प्रशासक संबंधित ग्रामपंचायतींचा कार्यकाळ समाप्तीच्या तारखेला कार्यभार स्वीकारणार आहेत. ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार, विकासकामे, शासकीय योजना, अनुदानांचे व्यवस्थापन व नागरिकांच्या मूलभूत सुविधा या सर्व बाबींची जबाबदारी प्रशासकांवर राहणार आहे. प्रशासक म्हणून नेमणूक अधिकाऱ्यांची बदली झाल्यास त्यांच्या जागी नेमण्यात आलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहावे. तसेच जर संबंधित अधिकाऱ्यांचे पद रद्द झाल्यास विलिनीकरण झाल्यास याबाबत संबंधित खात्याकडून माहिती घेऊन संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करणे अनिवार्य असल्याचे आदेशात म्हटले आहे. प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामीण विकासात खंड पडणार नसून याला उभारी मिळणार आहे.
ग्रामपंचायतनिहाय प्रभारी
विविध बेळगाव ग्रामीण गटशिक्षणाधिकाऱ्यांवर करडीगुद्दी, सुळेभावी, मारिहाळ, पंचायतराज अभियंता उपविभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता बाळेकुंद्री बी. एच., बाळेकुंदी के.एच., मोदगा, शहर पाणीपुरवठा बेळगाव (दक्षिण) चे साहाय्यक कार्यकारी अभियंता येळ्ळूर, धामणे एस., सुळगा (वाय.), फळबागायत खात्याचे वरिष्ठ साहाय्यक संचालक हलगा, मुत्नाळ, अरळीकट्टी, पशूसंगोपन खात्याचे साहाय्यक संचालक बस्तवाड, तारिहाळ, मास्तमर्डी, कृषी खात्याचे साहाय्यक संचालक होनगा, काकती, कडोली, सार्वजनिक बांधकाम खाते बेळगाव उपविभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अंकलगी, के. के. कोप्प, नंदीहळ्ळी, लघु पाटबंधारे खात्याचे साहाय्यक कार्यकारी अभियंता भेंडिगेरी, कुकडोळी, बडस के. एच., तालुका अनुसूचित वर्ग कल्याण खाते अगसगा,
केदनूर, बंबरगा, तालुका मागासवर्ग कल्याण खात्याचे साहाय्यक संचालक उचगाव, आंबेवाडी, बेकिनकेरी, बालकल्याण योजना खाते (ग्रामीण) कंग्राळी के. एच., कंग्राळी बी. के., भू दाखले खात्याचे साहाय्यक संचालक निलजी, मुतगा, मत्स्योद्योग खात्याचे साहाय्यक संचालक मुंडोळी, बिजगर्णी, बेळवट्टी, समाज कल्याण खात्याचे साहाय्यक संचालक (ग्रेड-1) सुळगा (उ), तुरमुरी, कुद्रेमनी, अक्षरदासोह विभागाचे साहाय्यक संचालक कलखांब, मुचंडी, अष्टे, रेशीम खात्याचे विस्तार अधिकारी धरनट्टी, हुदली, शहर गटशिक्षणाधिकारी नवी वंटमुरी, हंदीगनूर, देसूर, बालकल्याण योजना खाते (शहर) तुम्मरगुद्दी, सांबरा, बेळगुंदी, अल्पसंख्याक विकास निगमचे साहाय्यक संचालकांची किणये, संतिबस्तवाड, वाघवडे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
इच्छुकांची आतापासूनच मोर्चेबांधणी
काही ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून काही ग्रामपंचायतींचा एक-दोन महिन्यात संपणार आहे. मात्र इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून विविध कार्यक्रमांच्या खैराती देत आहेत. आगामी काही महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका होणार असून तशा हालचाली सरकारदरबारीही होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण होते. यासाठी इच्छुक मतदारांना आकर्षित करण्यासाठी आतापासूनच तयारी करत असल्याचे पहावयास मिळत आहे.