For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा पालिकांवर प्रशासक

02:51 PM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
सहा पालिकांवर प्रशासक
Advertisement

डिचोली, कुडचडे, काणकोण, पेडणे, कुंकळ्ळी, वाळपईचा समावेश

Advertisement

पणजी : राज्य सरकारने राज्यातील सहा पालिकांवर प्रशासकाची नियुक्ती केली असून तसा आदेश नगरपालिका प्रशासन खात्याने जारी केला आहे. यामध्ये डिचोली, कुडचडे - काकोडा, काणकोण, पेडणे, कुंकळ्ळी, वाळपई या नगरपालिकांचा समावेश असून त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याची वेळ जवळ येऊन ठेपल्याने निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी काळात निवडणुका होणार असलेल्या 11 नगरपालिकांच्या प्रभागांची पुनर्रचना दाखवणारा मसुदा निश्चित करण्यात आला असून तो संबंधित तालुका उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालयात जनतेच्या प्रतिसादाकरिता खुला केला आहे. येत्या 7 एप्रिलपर्यंत त्यावर आक्षेप, सूचना, तक्रारी सादर कराव्यात, अशी नोटीस राज्य निवडणूक आयोगाने जारी केली आहे.

मसुदा जनतेसाठी खुला

Advertisement

पेडणे, वाळपई, डिचोली, म्हापसा, मुरगांव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, कुडचडे - काकोडा, सांगे या 11 पालिकांच्या निवडणुका नजिकच्या काळात होणार आहेत. त्यांची नगरसेवक आणि प्रभाग संख्या राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे. प्रभाग सीमा आयोगाने ठरवल्या असून त्याचा मसुदा तयार केला आहे. तो जनतेच्या अवलोकनार्थ खुला करण्यात आला असून कार्यालयीन वेळेत तो पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहे.

हरकती नोंदवण्याचे आवाहन

उपजिल्हाधिकारी, मामलेदार तसेच संबंधित पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांकडे हरकती, दुरुस्ती, आक्षेप, तक्रारी लेखी स्वरुपात सादर करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. शुक्रवार 3 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी व 5 एप्रिल रोजी रविवार असल्याने त्या दोन्ही दिवशी सदर मसुदा पाहणीसाठी उपलब्ध होणार नाही, असे कळवण्यात आले आहे.

चार पालिकांचा कार्यकाळ संपुष्टात

डिचोली, कुडचडे - काकोडा, काणकोण व पेडणे या चार नगरपालिकांचा कालावधी काल 31 मार्च रोजी संपुष्टात आला असून तेथील प्रशासक नेमणूक आज 1 एप्रिलपासून लागू झाली आहे. कुंकळ्ळी व वाळपई पालिकांचा कालावधी अनुक्रमे 5 आणि 8 एप्रिल रोजी संपुष्टात येणार असून तेथील प्रशासक 6 व 9 एप्रिलपासून लागू होणार आहेत. नगरपालिका प्रशासक ब्रिजेश मणेरकर यांनी हा आदेश जारी केला आहे.

पालिका व प्रशासकांची नावे

  • डिचोली : अक्षय पोटेकर (पोलिस डिजीपी प्रशासकीय संचालक)
  • कुडचडे-काकोडा : सगुण गावडे (एमडी, गोवा शिक्षण विकास महामंडळ)
  • काणकोण : शंकर गावकर (सदस्य सचिव, कला अकादमी)
  • पेडणे : श्रीकांत पेडणेकर (अबकारी साहाय्यक आयुक्त)
  • कुंकळ्ळी : विकास कांबळे (सीईओ, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत)
  • वाळपई : राजू देसाई (वन तडजोड अधिकारी, उत्तर गोवा)
Advertisement
Tags :

.