एका दिवसात पॅचवर्कचे काम पुर्ण करा ! प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या सुचना, विसर्जन मार्गाची पाहणी
कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील खराब रस्त्यांवरील पॅचवर्कची कामे मंगळवारी संध्याकाळ पर्यंत पुर्ण करा अशा सुचना सोमवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. सोमवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी विसर्जन मार्गाची पाहणी करुन तातडीने या रस्त्यावर पॅचवर्क करा अशा सुचना दिल्या.
घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. इराणी खण येथे करण्यात येत असलेल्या तयारीची व मिरवणूक मार्गाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी सायंकाण पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे मंगळवार सायंकाळपर्यंत डांबरी पॅचवर्कद्वारे मुजविण्याचे आदेश सर्व उपशहर अभियंता यांना दिले.
विसर्जन मार्गाची फिरती करताना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी उमा टॉकीज, सावित्रीबाई फुले हॉस्पीटल, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेश, रंकाळा टॉवर, पद्माराजे उद्यान. राजकपूर पुतळा, इराणी खण या मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने मंगळवारी सायंकाळपर्यंत डांबरी पॅचवर्कने मुजविण्याच्या सूचना दिल्या. तसेच इराणी खण येथे घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी आवश्यक त्या ती सर्व सोयी सुविधा मागील वर्षाप्रमाणे तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या. यानंतर प्रशासकांनी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, देवकरपाणंद, इराणी खण या पर्यायी मिरवणूक मार्गाचीही पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, नेहा आकोडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता आर के पाटील, महादेव फुलारी, सुरेश पाटील, आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, सहा.अभियंता व्ही एन सुरवसे, कनिष्ठ अभियंता अनिरुध्द कोरडे, उपस्थित होते.