पळशी येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह
एकंबे :
पळशी (ता. कोरेगाव) येथे शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास होणारा बालविवाह प्रशासकीय यंत्रणेने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रोखला. मुलगी अल्पवयीन असल्याने कायद्याप्रमाणे तिचा विवाह करता येणार नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकांनी विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पालकांचे समुपदेशन करण्यात आले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख यांच्या सूचनेनुसार केस वर्कर सुजाता शिंदे, वैभव सोनवणे यांच्यासह सातारारोड येथील ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी विजय ढाणे आणि अंगणवाडी सेविकांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. बालविवाह रोखल्यानंतर जिल्हा महिला व बालकल्याण समिती समोर संबंधित अल्पवयीन मुलीला हजर करण्यात आले होते. यावेळी मुलीला आणि तिच्या पालकांना बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबतच्या कायदेशीर तरतुदींची माहिती देखील देण्यात आली.
सातारारोड येथे वास्तव्यास असलेल्या एका समाजातील अल्पवयीन मुलीचा शनिवारी पळशी येथे एका मंगल कार्यालयात विवाह होणार होता. तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी तिचा गावदेव सोहळा देखील जोरदार काढण्यात आला होता. याबाबतची तक्रार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे काही जागरूक नागरिकांनी केली होती. त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे आणि प्रभारी बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर संबंधित अल्पवयीन मुलीला जिल्हा महिला व बालविकास समितीसमोर हजर करण्यात आले. मुलीचे आणि पालकांचे समुपदेशन करण्यात आले.
सातारारोड आणि पळशी येथे शुक्रवार सायंकाळपासून बालविवाह बाबतीत हालचाली सुरू असताना देखील कोरेगाव पोलीस ठाण्यात आणि त्यांच्या अंकित असलेल्या सातारारोड पोलीस दूरक्षेत्रातील एकाही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला याबाबतची माहिती नव्हती. बालविवाह रोखल्याची माहिती संपूर्ण जिह्यात पसरल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात आणि सातारारोड पोलीस दूरक्षेत्रात चौकशी केली असता, आम्हाला काहीही माहिती नाही. आमच्याकडे कोणी आले नाही, अशी बतावणी त्यांनी केली. विशेष म्हणजे सातारारोड आणि पळशी येथील पोलीस पाटील देखील या घटनेपासून लांब होते. त्यांना देखील काहीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. एकूणच कोरेगाव तालुक्यात पोलिसांचे कामकाज हे कागदपत्रे सुरू असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.