विधानसभा निवडणुकीचा प्रशासकीय खर्च 45 कोटी रुपये
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया शांततेप पार पडली आहे. निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाला जिल्ह्यातील दैनंदिन कळवण्यात आला आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सुमारे 45 कोटी रुपये प्रशासकीय खर्च झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहितेची योग्य अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण दहा मतदारसंघात 33 लाख 5 हजार 98 मतदार होते. त्यापैकी 25 लाख 32 हजार 657 मतदारांनी मताचा अधिकार बजावला. मतदानात कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी राज्यात सर्वाधिक 76.63 टक्के राहिली आहे. यामुळे निवडणूक आयोगाने कोल्हापूर जिल्हयाचे विशेष अभिनंदन केले आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पादरर्शीपणे राबवण्यात आली आहे. राजकीय पक्ष तसेच उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीसमोर ईव्हीएम मशीनची पडताळणी केली होती. मतमोजणीनंतर करवीर मतदारसंघातील मतमोजणीबाबत घोटाळा झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरुन व्हायरल झाले होते. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. संबंधित उमेदवारांनेही आक्षेप नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 45 कोटी प्रशासकीय खर्च झाला आहे असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उप निवडणूक अधिकारी समाधान बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ उपस्थित होते.