For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा

10:39 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा
Advertisement

राकसकोप धरणातील जादा पाण्याचा साठा मार्कंडेय नदीपात्रात : पिके कुजुन मोठे नुकसान

Advertisement

वार्ताहर/उचगाव

बेळगावच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला पूर येऊन नदीपात्रातील पाणी नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर भात पिकातून शिरले आहे. चार-पाच दिवसांपासून राकसकोप धरणातील जादा पाणीसाठा नदीपात्रात सोडल्याने सध्या पाण्याची पातळी अधिकच वाढली आहे. शेतवडीत लागवड केलेली भातरोप, ऊसपीक व उगवलेली सर्व पिके आठवड्यापासून पाण्याखाली असल्याने कुजून पूर्णपणे खराब झाली आहेत. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गाने केली आहे.

Advertisement

पश्चिम भागातील बेळगुंदी, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, सुळगा, उचगाव, मण्णूर, आंबेवाडी, गोजगा या संपूर्ण भागाला या पाण्याचा अधिक फटका बसतो. मार्कंडेय नदीच्या दुतर्फा पसरलेल्या जमिनीमध्ये भाताची पेरणी, तसेच भाताची रोप लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. मात्र पावसाच्या जोरदार माऱ्याने पाण्याच्या पातळीत अधिक वाढ होऊन पाण्याचा प्रवाह वाढल्याने जमिनीतील सर्व भात रोपे वाहून गेली आहेत. काही भागातील भातजमिनीत दोन ते तीन फूट पाणी राहिल्याने ही सर्व भातपिके कुजून खराब झाली आहेत. आता पुन्हा दुबार लागवड करायची तर रोपे आणणार कोठून, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

नदीकाठाला असलेल्या जमिनीत दरवर्षी शेतकऱ्यांना पावसाळी हंगामात मार्कंडेय नदीच्या पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान दरवर्षी सहन करावे लागते. मात्र शासन कोणतीही आर्थिक मदत करत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नदीच्या दुतर्फा असलेल्या भात पिकावर अनेक शेतकऱ्यांची उपजीविका चालत असते. उसाचेही मोठ्या प्रमाणात पीक याच भागात असते. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात मार्कंडेय नदीला पूर येऊन तसेच राकसकोप धरणातील अधिक पाण्याचा साठा झाल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने याचा संपूर्ण फटका शेतकऱ्यांना दरवर्षी सहन करावा लागतो. यासाठी शासनाने भरीव आर्थिक मदत शेतकऱ्यांना करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात होत आहे.

पाणी शहराला, त्रास शेतकऱ्यांना

मार्कंडेय नदीच्या परिसरात असलेल्या पिकांमध्ये दरवर्षी भाताची पिके पाण्यात कुजून जातात. मात्र याचे शासन व लोकप्रतिनिधींना कोणतीही काळजी नाही. कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिली जात नाही. शेतकरी कसेबसे आपले जीवन कंठत असतात. राकसकोप धरणातील पाणी हे बेळगाव शहराला मिळते. या पाण्याचा या भागातील नागरिकांना उपयोग नाही. मात्र जादा झालेले पाणी नदीच्या पात्रात सोडून शेतकऱ्यांचे मात्र दरवर्षी हाल केले जातात. यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात आणि या भागातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य करावे.

- मारुती खांडेकर शेतकरी, तुरमुरी.

Advertisement
Tags :

.