For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कन्नडसक्ती विरोधी मोर्चाला प्रशासनाचा नकार

06:44 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
कन्नडसक्ती विरोधी मोर्चाला प्रशासनाचा नकार
Advertisement

कायदा-सुव्यवस्थेचे कारण केले पुढे : म. ए. समितीच्या निर्णयाकडे लक्ष

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 22 रोजी कन्नडसक्ती विरोधात महामोर्चा काढला जाणार होता. परंतु या महामोर्चाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. तसे पत्र पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शनिवारी म. ए. समितीला दिले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत परवानगी नाकारण्यात आल्याने आता म. ए. समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

22 जून रोजी बेळगावमध्ये काढल्या जाणाऱ्या महामोर्चासाठी आठ दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परवानगी देण्याचा अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर शनिवारी पोलीस आयुक्तांनी उत्तर देत कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून परवानगी नाकारली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.

मोर्चामुळे बेळगावमध्ये विविध भाषिक समुदायांमधील सौहार्दाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. कॉलेज रोड, तसेच इतर परिसर हा वर्दळीचा व संवेदनशील भागातून जात असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच आपत्कालीन सेवांमध्ये व्यत्यय येणार असून कर्नाटक पोलीस अधिनियम 1963 नुसार मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी कळविले आहे.

निवेदन देण्यास परवानगी

आपले म्हणणे मांडण्यासाठी लोकशाही हक्काचा समतोल साधण्यासाठी एका प्रतिनिधी मंडळातर्फे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याची परवानगी दिली जाणार आहे. कायदेशीर परवानगीशिवाय मिरवणूक, रॅली काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता महाराष्ट्र एकीकरण समिती पुढे कोणती भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.