For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महसूल समस्या निकालात काढण्यास प्रशासन सज्ज

06:23 AM Apr 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
महसूल समस्या निकालात काढण्यास प्रशासन सज्ज
Advertisement

फेरफार निपटारा अन् सुविधा शिबिराच्या पहिल्याच दिवशी अनेक प्रकरणे निकालात

Advertisement

त.भा. प्रतिनिधी

पणजी : नागरिकांच्या महसूल संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने उत्तर गोवा जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित ‘फेरफार निपटारा आणि सुविधा शिबिर’ काल शनिवारी यशस्वीरित्या पार पडले. जिल्ह्यातील सर्व मामलेदार कार्यालयांमध्ये एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. उत्तर गोव्यातील सर्व मामलेदार कार्यालयांमध्ये आयोजित केलेल्या या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी अनेक फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली.

Advertisement

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली फेरफार (म्युटेशन) प्रकरणे मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. शनिवारी अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहून आपल्या जमिनीच्या नोंदींचे काम पूर्ण करून घेतले. कागदपत्रांची पूर्तता असलेल्या प्रकरणांचा निपटारा तातडीने करण्यात आला, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमातून प्रशासनाची उत्तरदायित्व, प्रतिसादक्षमता आणि पारदर्शकतेप्रती असलेली वचनबद्धता स्पष्टपणे दिसून येते. सरकारी सेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि महसूल विभागातील कामात गतिमानता आणण्यासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरत असल्याचे मत महसूल अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

फॉर्म 1 व 14 चे तात्काळ वाटप

केवळ फेरफारच नव्हे, तर जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा मानल्या जाणाऱ्या ‘फॉर्म 1 व 14’चे वाटपही या शिबिरात करण्यात आले. अनेक महिने कार्यालयाच्या फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांना शनिवारी एकाच छताखाली ही सुविधा मिळाल्याने प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आजही शिबिर सुरू राहणार

ज्या नागरिकांना काल, शनिवारी काही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही, त्यांच्यासाठी या शिबिराचा दुसरा दिवस रविवारी 19 एप्रिल रोजी देखील सुरू राहणार आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांसाठी संबंधित मामलेदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.