Jyotiba Temple | जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज; नियोजन बैठकीत आढावा
जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमा यात्रेची जय्यत तयारी
जोतिबा डोंगर: महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा दि. १ एप्रिल रोजी होत असून यात्रा नियोजनासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने जोतिबा डोंगर येथे आयोजित केलेल्या प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली यात्रा नियोजनाच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
जोतिबा चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश आदी राज्यातून लाखो भाविक डोंगरावर येतात. त्यासाठी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी, यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आणि पाश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीन आतापासून तयारी सुरू केली आहे. जोतिबा चैत्र यात्रा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आत्तापासून तयारीला लागा, अशी सूचना बैठकीत देण्यात आली. तसेच अतिक्रमण काढण्यावरही यावेळी चर्चा झाली.
यावेळी पोलीस, आरोग्य, ग्रामपंचायत, देवस्थान या महत्त्वाच्या विभागाकडून माहिती घेण्यात आली. या आढावा बैठकीला तहसीलदार माधवी शिंदे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, पन्हाळा-शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.