Sangli News | गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणावर प्रशासनाचा कडक वॉच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सांगली : जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमिवर मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी निर्गमित केले आहेत. ध्वनी प्रदूषण नियम, २००० मधील नियम ७ नुसार नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात ध्वनीप्रदूषण नियमांच्या उल्लंघनासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा सुरू करावी. संबंधित संस्थांनी प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन तिचे निवारण करावे.
प्रचलित, पारंपरिक पध्दतीशिवाय महानगरपालिकांनी व नगरपालिकांनी टोल फ्री क्रमांक तसेच ई मेल, लघु संदेश व व्हॉटस् अॅपद्वारे ध्वनीप्रदुषण तक्रारी स्वीकारण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी. ध्वनीप्रदूषणासंदर्भातील तक्रारींसाठीस्थानिक पोलीस कार्यालय स्तरावर नियुक्त यंत्रणेचे नाव, दूरध्वनी क्रमांक आदि माहिती विविध माध्यमांतून प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव, नवरात्रीसह महत्त्वाच्या उत्सवांपूर्वी महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संबंधित उत्सवमंडळांच्या पदाधिकायांची तसेच आवश्यकतेनुसार स्थानिक राजकीय नेते, मोहल्ला समित्यांचे सदस्य यांना निमंत्रित करून त्यांची बैठक घ्यावी. त्यात ध्वनीप्रदूषण कायदे व नियम, तसेच रस्त्यावर, पदपथावर तात्पुरते मंडप उभारण्याबाबतच्या नियमांची व कायदेशिर तरतुदींच्या भंगाचे परिणाम याबाबत माहिती द्यावी.
रस्त्यावर किंवा पदपथावर तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. मंडप किंवा तत्सम रचना उभारण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे आवश्यक आहे.धार्मिक कार्यक्रमापूर्वीही आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ध्वनीप्रदूषण नियम २००० मधील नियम ५ उपनियम १ नुसार पूर्वपरवानगी शिवाय ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरण्यात येणार नाही. जाहिरात फलक, फ्लेक्स, तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या मंडप व तत्सव रचनाजवळ वा त्या ठिकाणी पूर्वपरवानगी शिवाय लावू नयेत,रस्त्यावर व पादचारी मार्ग खोदण्यात येऊ नयेत, या अटी तात्पुरत्या सवरूपात मंडप व तत्सम रचना उभारण्यासठी परवानगी देते वेळी परवानगी पत्रात नमूद कराव्यात.