Kolhapur : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रशासनाची जोरदार तयारी!
दिवाळीनंतर निवडणूका जाहीर होण्याची शक्यता
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणासाठी आरक्षण प्रक्रिया पार पडली आहे. या आरक्षणावर हरकती फारशा आल्या नाहीत. दिवाळीनंतर जिल्हा परिषदआणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो यासाठी जिल्हा प्रशासनाकडूननिवडणुकीची तयारी करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत संपून साडेतीन वर्षे झाली. पण निवडणूक झाली नाही. न्यायालयाने या निवडणूका घेण्याचे निर्देश दिल्यावर राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्यात आली. जुलै महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रारुप मतदार संघ जाहीर करण्यात आले. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज असणार आहे.
13 ऑक्टोबर रोजी गट आणि गणांचेही आरक्षण जाहीर झाले. येथेही 50 टक्के महिला आरक्षण आहे. यामुळे अनेक तालुक्यात कही खुशी कही गम असे चित्र निर्माण झाले आहे. आरक्षण सोडतीनंतर गट आणि गणांमध्ये इच्छुकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत भेटीगाठी करण्यात येत आहे. पक्षाचे तिकिट मिळो अथवा न मिळो अनेक इच्छुक उमेदवारांकडून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार केला जात आहे.
इच्छुकांकडून निवडणुकांची तयारी सुरु असताना प्रशासकीय पातळीवरही निवडणूक प्रक्रियेचे काम सुरु आहे. आरक्षणावर फारशा हरकती आल्या नाहीत. यामुळे 27 ऑक्टोबर पर्यंत गणनिहाय मतदार याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. 4 नोव्हेंबरपर्यंत गणाच्या मतदार याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. निवडणूक विभागाकडून निवडणूकीची तयारी सुरु असून दिवाळीनंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
मतदार यादीवर आक्षेप
राज्यातील मतदारयाद्यांमध्ये गोंधळ सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एका संस्थेकडूनमतदार याद्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एकाच मतदारसंघात दुबारतिबार ते नऊ वेळा नांवे असल्याचे समोर आले आहे. यामुळे यामतदार याद्यांवर आक्षेप घेऊन विरोधी पक्षांकडून निवडणीकीपूर्वी मतदार यादीतील नांवे काढण्याची मागणी केली आहे. मतदार याद्यांबाबत संशय कायम आहे. 27 ऑक्टोबरपर्यंत गणनिहाय मतदार याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. 4 नोव्हेंबरपर्यंत गणाच्या मतदार याद्या अंतिम करण्यात येणार असल्या तरी या मतदार यादीतील आक्षेपमुळेनिवडणूक विभागासमोर आव्हान निर्माण झाले आहे.