मोकाट जनावरांच्या दहशतीपुढे प्रशासन हतबल
आजच्या धावपळीच्या युगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्तींना दररोज भेडसावणाऱ्या अशा काही समस्या आहेत ज्या समस्या शासन-प्रशासनाला फार गंभीर वाटत नाहीत किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. अशीच एक सध्याची खूपच गंभीर समस्या म्हणजे भटके कुत्रे आणि मोकाट गुरांचा उपद्रव. कोकणातील प्रमुख महामार्गांबरोबरच आणि गावागावात जाणारे रस्तेसुद्धा यास अपवाद राहिलेले नाहीत. रस्त्यावर अचानक आडव्या येणाऱ्या गुरांमुळे वाहनचालकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरणेदेखील मुश्कील झाले आहे. या वाढत्या उपद्रवापुढे कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांदेखील हतबल असल्याचे चित्र आहे.
मागील काही वर्षात शेतीसाठी पॉवर टीलरचा वापर वाढला आहे. तर काही गुरे जुनी व आजारी बनल्याने संबंधित मालकांकडून अशा गुरांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोकाट गुरांची समस्या अधिक बिकट होत चालली आहे. अनेक पशुपालक आपल्या गायी, म्हशी व बैलांना दिवसा चरायला मोकाट सोडतात आणि संध्याकाळी घरी आणतात. जनावरांना गोठ्यात ठेवण्याऐवजी मोकाट सोडल्यास त्यांच्यासाठी खाणे अथवा चारा शोधण्याचा खर्च वाचतो, या चुकीच्या मानसिकतेमुळे मोकाट गुरांचा प्रश्न जटील बनत चालला आहे. कोकणात काही स्थानिक स्वराज्य संस्थांचा अपवाद वगळता अनेक ठिकाणी दैनंदिन घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाची यंत्रणा फारशी प्रभावी नाही. कचरा नियमितपणे उचलला जात असला तरी त्यावर शास्त्राsक्त प्रक्रिया होऊन त्याची नीट विल्हेवाट लावली जात नाहीय. डंपिंग ग्राऊंडमधील कचऱ्यात अनेकदा आग धुमसत असते. तेथील कचऱ्यात मोकाट गुरांचा वावर असतो. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी तसेच शहराबाहेरील प्रमुख रस्त्यांलगत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातोय. यातून रहदारीच्या ठिकाणी नवी समस्या निर्माण झालीय ती म्हणजे भटके कुत्रे आणि उनाड गुरांची.
पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई-गोवा महामार्गावर लेटेनजीक रात्रीच्यावेळी बैल आडवा येऊन झालेल्या अपघातात एका 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात बैलाचाही मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वीच रत्नागिरीत गजबजलेल्या बाजारपेठेत पाच ते सहा मोकाट गुरांच्या कळपाने रस्त्यावर चालणाऱ्या महिलेला उडवले. यात महिला गंभीर जखमी झाली. त्याअगोदर भर बाजारपेठेत बैलांच्या झुंजीमुळे काही दुकाने व दुचाकींचे नुकसान झाले होते. कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचेही मोकाट गुरांमुळे नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. एकाचवेळी 15 ते 20 गुरे वर्दळीच्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. गुरांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक ठिकाणी घाण, दुर्गंधी पसरते. अगदी शासकीय कार्यालयांमध्येही गुरे घाण करतात. मात्र या समस्येवर म्हणावे तसे नियंत्रण कोकणातील प्रशासकीय यंत्रणेला मिळवता आलेले नाही. मोकाट गुरांपुढे प्रशासकीय यंत्रणा अक्षरश: हतबल असल्याचे पहावयास मिळते. एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मुळातच अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्यात परत महत्प्रयासाने पकडलेल्या गुरांची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडते. संबंधित मालकांना दंड भरून गुरे घेऊन जाण्याची सूचना केली गेली तर त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अखेर अशा गुरांची रवानगी गोशाळांमध्ये करावी लागते. परंतु गोशाळांनाही काही मर्यादा असतात. मग या मोकाट गुरांचा प्रश्न कायमचा निकाली काढायचा तरी कसा, हा प्रश्न कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पडला आहे. त्यामुळे गोशाळांची संख्या किंवा त्यांची क्षमता वाढवून हा प्रश्न सोडविण्याचा विचार आता लोकप्रतिनिधींना करावा लागणार आहे. रत्नागिरी शहराचे उदाहरण द्यायचे झाल्यास, मोकाट गुरांच्या बिकट समस्येवरून पालिका प्रशासनाची कोंडी वाढत चालली आहे. शहरात पकडण्यात आलेल्या 76 मोकाट गुरांचा तिसरा लिलावही 1 सप्टेंबर रोजी खरेदीदारांअभावी निष्फळ ठरला. त्यामुळे नगर परिषद प्रशासनासमोर या जनावरांची देखभाल आणि सुरक्षेचा गंभीर पेच निर्माण झाला आहे. गुरांना एखाद्या गोशाळेत हलविण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. यासाठी प्रशासनाकडून सध्या चांगल्या आणि सक्षम गोशाळेचा शोध घेतला जात असून, गोशाळा निश्चित होताच ही सर्व गुरे तेथे रवाना केली जाणार आहेत.
मोकाट गुरांप्रमाणे भटक्या कुत्र्यांची दहशतसुद्धा प्रचंड वाढली आहे. रत्नागिरी शहरातील पोलीस लाईन परिसरात एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. दुचाकीस्वारांचाही भर रस्त्यात जीवघेणा पाठलाग केला जातो. अशा घटनांमध्ये दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना कोकणातील अनेक भागात घडलेल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चिपळूण नगरपरिषदेने केलेल्या एका सर्वेक्षणात शहरात सुमारे 5 हजार भटकी कुत्री असल्याची बाब समोर आली आहे. तर रत्नागिरी नगर परिषदेने 2024-25 मध्ये राबवलेल्या सर्वेक्षणात शहरात सुमारे 3,600 भटक्या कुत्र्याची नोंद झाली होती. ज्यापैकी 1,600 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते.दरम्यान, रत्नागिरीतील घटनेनंतर मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चंपक मैदानावर निवारा केंद्र उभारण्याचे नियोजन नगर परिषदेने केले आहे. यासाठी शहरातील चंपक मैदान परिसरात सुमारे दीड हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड
ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या केंद्राची संपूर्ण आखणी केली जात आहे. चिपळूण नगरपरिषदेनेही भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नसबंदी शस्त्रक्रिया वर्षातून दोनवेळा करण्याचा प्रयत्नही नगरपरिषदेकडून केला जाणार आहे.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर एक उपाय म्हणून नागरिकांनीदेखील परदेशी महागड्या जातीचे कुत्रे विकत घेण्याऐवजी आपल्या भागातील भटक्या कुत्र्यांना प्राधान्य दिले पाहिजे. शहरांमध्ये अशीही काही निवासी संकुले आणि घरे आहेत जिथे स्थानिक कुत्रे पहावयास मिळतात जे आपली हद्द सोडून कधीच रस्त्यावर जाऊन भुंकताना किंवा अन्नासाठी इतरत्र हिंडताना दिसत नाहीत.
नागरिकांनी रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा, शिळे अन्न तसेच मांसाहारी उरलेले अन्न टाकणेदेखील बंद केले पाहिजे. कचरा व्यवस्थापन चांगले झाले तर भटके कुत्रे आणि उनाड गुरांचा उपद्रवही बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकेल, हे स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्षात घेतले पाहिजे.