राज्याच्या अर्थसंकल्पासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतली खाते प्रमुखांची बैठक
पणजी : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 ते 27 मार्च या दरम्यान निश्चित झाल्याने या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी विविध सरकारी खाते प्रमुखांची बैठक घेऊन अर्थसंकल्पाच्या तयारीचा आढावा घेतला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे विविध खात्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रमुख म्हणून राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांची नियुक्त करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. पर्वरी मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीला मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी पुरवठा खाते, पेयजल खाते, वीज खाते अशा विविध खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 6 मार्च रोजी प्रारंभ होणार असल्याने या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 मार्चपर्यंत चालणार आहेत.