बॉलिवूड पदार्पण करणार अदिवी शेष
अभिनेता-लेखक अदिवी शेष स्वत:च्या बॉलिवूड पदार्पणासाठी तयार आहे. तेलगू चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरलेला अदिवीच्या हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. अदिवीच्या ‘मेजर’ आणि ‘डकैत’ यासारख्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्याच्या प्रेक्षकांची कक्षा खूपच वाढली आहे. वेगवेगळ्या चित्रपटसृष्टी अन् भाषांमध्ये त्याच्यासोबत काम करण्यावरून उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे.
आगामी हिंदी चित्रपटात अदिवी शेषसोबत आणखी एक अभिनेता तसेच अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहे. निर्माते सप्टेंबर महिन्यात निर्मितीपूर्व काम सुरू करणार आहेत. तर उर्वरित कलाकारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. मुख्य चित्रिकरण ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तर चित्रपटाचे नाव अन् दिग्दर्शकाची ओळख सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे.
अदिवी शेष यापूर्वी ‘डकैत’ या चित्रपटात दिसून आला होता. यात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत होते. तर अदिवी पुढील काळात ‘गुडाचारी 2’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत इमरान हाश्मी आणि वामिका गब्बी देखील प्रमुख भूमिकेत असतील.