पंतप्रधान मोदी यांना भेटले आदित्यनाथ
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने या भेटीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. दोन्ही नेत्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याची माहिती उपलब्ध झालेली नाही. तथापि, उत्तर प्रदेशचे स्थानिक राजकारण आणि उत्तर प्रदेशातील ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण यांच्या संदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये हे अभियान हाती घेण्यात आले असून त्यावर बरीच चर्चा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याच्या आधी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे माजी दिवंगत मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धासुमन अर्पण केले. रामजन्मभूमी आंदोलनात कल्याणसिंग यांनी साकारलेल्या महत्वपूर्ण भूमिकेवर आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात प्रकाश टाकला. कल्याणसिंग यांचे निधन 2021 मध्ये झाले होते. कल्याणसिंग हे 1991 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात 1992 मध्ये बाबरी मशिदीचे पतन झाले होते. आता रामजन्मभूमीस्थानी भव्य राममंदिर साकारले आहे.