आदित्यची सुवर्णपदकाच्या लढतीत धडक
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : मॉन्टेनेग्रोमधील बुडवा येथे सुरू असलेल्या जागतिक 19 वर्षांखालील बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये, पुरुषांच्या 55 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अझरबैजानच्या निहात गॅसिमोव्हचा पराभव करून आदित्य अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा भारतीय बॉक्सर ठरला आहे.
आशियाई 19 वर्षांखालील स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या आदित्यने रविवारी रात्री झालेल्या लढतीत तिन्ही फेऱ्यांमध्ये वर्चस्व गाजवले आणि पंचांकडून 5-0 असा निकाल आपल्या बाजूने मिळवला. आता सुवर्णपदकासाठी होणाऱ्या लढतीत त्याचा सामना रशियाच्या इस्लाम मॅगोमेदोव्हशी होईल. त्याआधी, महिलांच्या 80 किलो वजनी गटात मेघा शेओकंदने उपांत्य फेरीत किर्गिस्तानच्या मीरिम चिनीबेकोव्हाविरुद्ध ‘आरएससी‘ विजयाद्वारे अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. या स्पर्धेत भारताला दोन कांस्यपदकेही मिळणार आहेत.
महिलांच्या 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत हर्षिकाने अमेरिकेच्या लॉरिन एल्मोरविरुद्ध जोरदार झुंज दिली, परंतु तिला 3-2 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी, महिलांच्या 80+ किलो वजनी गटात प्राची टोकासने उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदक पटकावले.
