आणखी एक बायोपिक आणणार आदित्य धर
‘धुरंधर’ फ्रेंचाइजीच्या यशानंतर आदित्य धरचा पुढील प्रोजेक्ट कोणता असेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. आदित्य धर लवकरच महान अहोम सेनापती लचित बोरफुकन यांची कहाणी मोठ्या पडद्यावर आणू शकतो. आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी या मोठ्या प्रोजेक्टसाठी आदित्य धरशी संपर्क साधल्याचे सांगितले आहे. व्यापक स्तरावर निर्माण होणाऱ्या हिंदी चित्रपटात लचित बोरफुकन यांच्या असाधारण वारशाला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता आदित्य धर यांच्याकडे आहे. या चित्रपटाद्वारे आम्ही लचित बोरफुकन यांचे शौर्य जगभरात पोहोचवू शकतो असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आहे. लचित बोरफुकन हे मध्यकालीन आसामच्या अहोम साम्राज्याचे एक महान सेनापती होते. त्यांना 1671 च्या सरायघाट येथील लढाईत स्वत:च्या साहसी नेतृत्वासाठी ओळखले जाते, जेथे त्यांच्या रणनीतिंमुळे मुघलांना पराभव पत्करावा लागला होता. या विजयाने ईशान्य भारतात मुघलांच्या विस्ताराला कायमस्वरुपी रोखले होते. बोरफुकन यांचा जन्म 1622 मध्ये झाला होता. तर 1672 मध्ये त्यांचे निधन झाले होते.