आदित्य बिर्ला फॅशन 1297 कोटी उभारणार
संचालक मंडळाची मान्यता : प्रेफरेंशियल इश्यू आणि क्यूआयपीद्वारे निधी उभारणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल (एबीएफआरएल) ला संचालक मंडळाकडून मोठी मान्यता मिळाली आहे. कंपनी प्रेफरेंशियल इश्यू आणि क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) द्वारे 1297.50 कोटी रुपये उभारणार आहे. आदित्य बिर्ला फॅशनने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळाची बैठक बुधवारी झाली असून या बैठकीत, बोर्डाने प्रेफरेंशियल इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स आणि क्यूआयपी यांच्या संयोजनाद्वारे 500 दशलक्ष डॉलर्स उभारण्यास मान्यता दिलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रमोटर ग्रुपच्या युनिट पिलानी इन्व्हेस्टमेंट अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनला 317.45 रुपयांच्या इश्यू किमतीवर 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 4.08 कोटी इक्विटी शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. यातून एकूण 1,297.50 कोटी रुपये मिळणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. प्रेफरन्सियल इश्यूचा आकार 27.5 कोटी डॉलर्स राहणार आहे. यामध्ये प्रमोटर ग्रुप 15 दशलक्ष डॉलर्स आणि फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स 12.5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करेल. आदित्य बिर्ला फॅशन शेअरमध्ये (मागील बंद किमतीनुसार) प्रमोटरचा हिस्सा 17.5 टक्के इतका महत्त्वपूर्ण आहे.