‘पारिवारिक मनुरंजन’मध्ये अदिति राव हैदरी
पंकज त्रिपाठींची चित्रपटात मुख्य भूमिका
अभिनेता पंकज त्रिपाठी हे आता अभिनेती अदिति राव हैदरीसोबत पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. या चित्रपटात हास्य, प्रेम आणि गोड भांडणाचे मिश्रण दिसून येणार आहे. तसेच यात लखनौतील संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.
पंकज त्रिपाठी आणि अदिति यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘पारिवारिक मनुरंजन’ असून याची निर्मिती भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि एएझेड फिल्म्सकडून केली जाणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लखनौमध्ये सुरू झाले आहे. हा चित्रपट रोमान्स, संस्कृती, भाषा आणि खान-पानचे शहर लखनौच्या पार्श्वभूमीवर आधारित असेल, ज्यात कॉमेडीचे आकर्षक मिश्रण दिसून येणार आहे.
या चित्रपटाची कथा अत्यंत सरळ अन् आकर्षक होती, याचमुळे मी याला नकार देऊ शकलो नाही. अदितिसोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि मी नेहमीच त्यांच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा केली असल्याचे पंकज त्रिपाठी यांनी म्हटले आहे. अशाप्रकारची कहाणी मिळणे मी दुर्लभ मानते. पंकज त्रिपाठींसोबत काम करणे एक आकर्षक अनुभव ठरणार असल्याचे वक्तव्य अदितिने केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही. शर्मा करणार आहे. तर पटकथा लेखनाची जबाबदारी बृजेंद्र काला आणि वरुण शर्मा यांनी सांभाळली आहे.