‘कोहली-कोहली’च्या जयघोषांनी अॅडलेड दणाणले
ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाजांची हवा : विराट-रोहित, बुमराहला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
वृत्तसंस्था/ अॅडलेड
बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करत मालिकेत आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थ कसोटीत शानदार विजय मिळवला. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने अष्टपैलू कामगिरी केली, ज्यात विराट कोहलीने देखील मोलाचे योगदान दिले होते. त्याने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले.
आता, मालिकेतील दुसरी कसोटी अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल येथे खेळवली जाणार आहे. दिवस-रात्रीचा हा सामना 6 डिसेंबरपासून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. दरम्यान अॅडलेडमध्येही चाहत्यांना विराट कोहलीकडून शानदार खेळीची अपेक्षा आहे. बुधवारी भारतीय संघ सरावासाठी जेव्हा मैदानावर पोहाचला तेव्हा मैदानावर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी विराटच्या नावाचा मोठा जल्लोष केला. विराट-रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचे चित्र अॅडलेड ओव्हलवर पहायला मिळाले. दरम्यान, टीम इंडियातील खेळाडूंनी जवळपास तीन तास मैदानावर कसून सरावावर भर दिला.