For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये मतदानावेळी अतिरिक्त फौजफाटा

06:24 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये मतदानावेळी अतिरिक्त फौजफाटा
Advertisement

हिंसाचार टाळण्यासाठी गृह मंत्रालयाकडून दक्षता

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यापूर्वी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) अतिरिक्त 27 तुकड्या राज्यात पोहोचणार आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान झालेला रक्तपात आणि पंचायत निवडणुकीत नुकताच झालेला हिंसाचार लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने निमलष्करी दलाच्या अतिरिक्त जवानांना तैनात करण्याची विनंती केली आहे. केंद्राने आधीच राज्यात ‘सीएपीएफ’च्या 150 तुकड्या तैनात केल्या आहेत. एका कंपनीत सुमारे 120 सैनिक आहेत.  देशातील कोणत्याही राज्यापेक्षा ही सर्वाधिक तैनाती आहे.

Advertisement

निवडणूक आयोगानंतर आता केंद्र सरकारने आगामी लोकसभा निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाने मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका पार पाडण्यासाठी मतदानापूर्वी 1 एप्रिलपर्यंत पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 27 अतिरिक्त कंपन्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष आणि हिंसक निदर्शनांमुळे पश्चिम बंगाल हे सर्वात संवेदनशील राज्य बनले आहे. पश्चिम बंगालमध्ये 1 जूनपर्यंत सात टप्प्यांत मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात कूचबिहार, अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी येथे मतदान होणार आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी केंद्रीय दलाच्या सुमारे 250 कंपन्या तैनात करण्याबरोबरच प्रत्येक जिह्यात एक नियंत्रण कक्षही तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला या नियंत्रण कक्षाचा प्रभारी बनवण्यात येणार आहे. येथील टीम प्रत्येक बुथवर लक्ष ठेवणार आहे.

Advertisement
Tags :

.