अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त ताण
विधवा महिलांच्या सर्व्हे कामामुळे सेविका मेटाकुटीस : अंगणवाड्यांचा कारभार डळमळीत
बेळगाव : अंगणवाडी सेविकांवर गृहलक्ष्मीबरोबर आता विधवा महिलांचे काम सोपविण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या मूळ कामावर याचा परिणाम होवू लागला आहे. अंगणवाडी सेविकांनी अतिरिक्त काम देऊ नये, अशी मागणी वारंवार केली आहे. मात्र शासनाकडून अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त कामाचा भार सोपविला जात आहे. त्यामुळे लहान मुलांना घडविणाऱ्या अंगणवाडीचा कारभार डळमळीत होवू लागला आहे. जिल्ह्यात 5 हजार 531 अंगणवाडी केंद्रे आहेत. यामध्ये नवीन, लहान-मोठ्या अंगणवाडींची भर पडली आहे. मात्र अंगणवाडी सेविकांवर मतदान कार्ड, गृहलक्ष्मी योजना आणि आता विधवा महिलांसाठी रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. शिवाय सदर कागदपत्रे संगणकाद्वारे ऑनलाईन अपडेट करावी लागत आहेत. या अतिरिक्त कामामुळे अंगणवाडीच्या दैनंदिन कामावर परिणाम होवू लागला आहे.
अतिरिक्त ताणामुळे गैरसोय
अंगणवाडी सेविकांना दैनंदिन अंगणवाडीच्या कारभारावर आहार, गर्भवती महिलांचा आहार आणि इतर कामांचा बोजा आहे. त्यातच शासनाने नवीन कामे सोपविली आहेत. गृहलक्ष्मी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी दिली आहे. त्याबरोबर आता विधवा महिलांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधितांची कागदपत्रे अपलोड करण्याचे कामही अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त ताणामुळे कारभारावर परिणाम होवू लागला आहे.
बालचमुंच्या शैक्षणिक जीवनावरही परिणाम
काही अंगणवाडी केंद्रांमध्ये सेविका आणि मदतनीसांची कमतरता आहे. त्यातच शासनाकडून अतिरिक्त कामाचा बोजा टाकला जात आहे. यामुळे अंगणवाडी बंद ठेवण्याची वेळ सेविकांवर येवू लागली आहे. आधीच अंगणवाडी केंद्रांमध्ये मदतनीस नसल्याने सेविकेलाच मदतनीसाचे काम करावे लागत आहे. त्यातच शासनाकडून कामाचा ताण वाढत असल्याने बालचमुंच्या शैक्षणिक जीवनावरही परिणाम होवू लागल्याचे निदर्शनास येत आहे.