सिमेंट उद्योग 16 कोटी टन क्षमता वाढविण्यास तयार
2027-28 च्या आर्थिक वर्षाकरीता क्रिसिल रेटिंगच्या अहवालामधून संकेत
नवी दिल्ली :
पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे, सिमेंट उद्योग 2024-25 ते 2027-28 या आर्थिक वर्षांमध्ये 15-16 कोटी टन क्षमतेची भर घालण्याची शक्यता आहे. क्रिसिल रेटिंगने मंगळवारी एका अहवालात ही माहिती दिली.
वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी तसेच उच्च स्पर्धात्मक उद्योगात बाजारातील वाटा वाढवण्यासाठी क्षमतेत वाढ केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात सिमेंटची मागणी आठ टक्के आणि 2022-23 मध्ये 12 टक्क्यांनी वाढली होती. पुढील आर्थिक वर्षात 7-75 दशलक्ष टन अतिरिक्त क्षमतेची भर पडण्याची अपेक्षा आहे. यापैकी 50-55 टक्के उत्पादन पूर्व आणि मध्य प्रदेशातून होणार आहे.
नियोजित क्षमता वाढीमध्ये मोठ्या कंपन्यांचा वाटा 50-55 टक्के असेल असे अहवालात म्हटले आहे. वाढता पुरवठा आणि कडक स्पर्धा यामुळे किमतीतील वाढ आटोक्यात राहील, परंतु खर्च कमी झाल्याने मार्जिन मर्यादीत राहतील.
गेल्या दोन आर्थिक वर्षांतील मजबूत मागणीने मोठ्या सिमेंट कंपन्या आणि काही मध्यम आकाराच्या कंपन्यांना लाभ झाला आहे. अशा स्थितीत त्यांनी क्षमता वाढविण्याचे नियोजन केले आहे.