मेहुल चोक्सीच्या अडचणीत वाढ
सीबीआयने नोंदवले दोन नवीन गुन्हे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) फरार उद्योगपती मेहुल चोक्सीविरुद्ध दोन नवीन गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयने मेहुल चोक्सी आणि इतरांविरुद्ध बँकांच्या संघाची आणखी 55.27 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन नवीन गुन्हे दाखल केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी ही माहिती दिली.
सीबीआयने शुक्रवारी मेहुल चोक्सीसह इतर आरोपींविरुद्ध दोन नवीन एफआयआर नोंदवले. आतापर्यंत चोक्सीसह सर्व आरोपींनी 6,371 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या दोन्ही एफआयआरनुसार, मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्स आणि नक्षत्र ब्रँड्सने अनेक बँकांची 6,371 कोटी रुपयांची फसवणूक केली. मेहुल चोक्सीच्या कंपन्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांमध्ये बनावट एलओयू जारी केले आणि नंतर या कंपन्यांना एनपीए घोषित केले गेले, असा आरोप आहे. याआधारे 9 बँकांचे सुमारे 6,371 कोटींचे नुकसान झाले. ही प्रकरणे 1 एप्रिल 2010 ते 31 जानेवारी 2018 दरम्यान करण्यात आली होती. या सर्व कागदपत्रातील गुंतागुंत तपासल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या महाव्यवस्थापकांनी 9 बँकांचा समूह म्हणून या वषी 21 मार्च रोजी सीबीआयच्या मुंबई कार्यालयात लेखी तक्रार केली. त्यानंतर सीबीआयने तपास करत 14 डिसेंबर रोजी दोन नवीन एफआयआर नोंदवले.
आतापर्यंतच्या निष्कर्षानुसार, पंजाब नॅशनल बँकेला 210 कोटी, बँक ऑफ बडोदाला 45.18 कोटी, बँक ऑफ इंडियाला 38.97 कोटी, कॅनरा बँकेला 84.84 कोटी, आयडीबीआय बँकेला 127.68 कोटी, युनियन बँकेला 128.48 कोटी, स्टेट बँकेला 44.66 कोटी, ऍक्सिस बँक 39.30 कोटी आणि आयसीआयसीआय बँकेला 121.72 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.