पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडणे झाले सेपे
विदेश मंत्रालयाने संपुष्टात आणली एक अट
नवी दिल्ली : पासपोर्टमध्ये आयुष्याच्या जोडीदाराचे नाव जोडण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. आतापर्यंत नाव जोडण्यासाठी विवाहाच्या नोंदणीची आवश्यकता भासत होती. सर्वसाधारणपणे भारतात पारंपरिक विवाह करणारे लोक नोंदणी करत नाहीत. अशा स्थितीत पासपोर्टमध्ये नाव जोडण्यासाठी त्यांना समस्येला सामोरे जावे लागत होते. आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. आता विवाह प्रमाणपत्राशिवाय आयुष्याच्या जोडीदाराचे नाव पासपोर्टमध्ये जोडता येणार आहे. याकरता केवळ दोघांचा एकत्रित फोटो सादर करावा लागेल आणि त्यावर संयुक्त स्वरुपात स्वाक्षरी करावी लागणार आहे.
अशाप्रकारे विवाहाचे स्वप्रमाणित छायाचित्रच दस्तऐवज मानण्यात येईल आणि त्याच्या आधारावर पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडले जाणार आहे. विदेश मंत्रालयाकडुन याकरता अॅनेक्सर जे चा पर्याय देण्यात आला आहे. आता एनेक्सर जे वर जात स्वत:च्या विवाहाचे छायाचित्र किंवा अन्य संयुक्त छायाचित्र अपलोड करावा लागेल. यालाच प्रमाणपत्र मानले जाणार आहे. सर्वसाधारणपणे विवाहाची नोंदणी एक जटिल प्रक्रिया असून लोक अनेक वर्षांपर्यंत ही नोंदणी करवित नाहीत. आता पासपोर्टमध्ये पती किंवा पत्नीचे नाव जोडण्यासाठी येणारी समस्या विदेश मंत्रालयाने पूर्णपणे दूर केली आहे.