मटका-जुगाराचा नाद... तरुणपिढी बरबाद!
सीमेवरील गावांमध्ये अड्डे, सभोवतालच्या गावातील तरुणाई नादी, विशीच्या तरुणांवर लाखोंचे कर्ज
रमेश हिरेमठ/बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्यात मटका व जुगार बिनदिक्कतपणे सुरू आहे. एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी आपण गैरधंद्यांना थारा देणार नाही, असे सांगत असले तरी बेळगाव अनेक गैरधंद्यांचे माहेरघर बनत आहे. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवरील काही गावातील तरुणही मटका व जुगारामुळे बरबाद होत चालले आहेत. शिनोळीच्या सीमेवरील गावात मटका, जुगारासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अनेक तरुणांच्या पालकांवर जमीन विकण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
बाचीसह परिसरातील अनेक गावातील तरुण मटका व जुगाराच्या नादी लागून कर्जबाजारी बनत आहेत. बाची येथील मुख्य रस्त्याला लागूनच अनेक ठिकाणी जुगारी अड्ड्यांचे शेड उभे राहिले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसांना या गैरधंद्यांची माहिती असूनही पोलीस यंत्रणा तिकडे फिरकूनही बघत नाही, अशी परिस्थिती आहे. इतकेच नव्हे तर बाची परिसरातील मटका, जुगारावर आळा घाला, अशी विनंती बाची येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांना करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.
19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी बाची येथील काही सुजाण नागरिकांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला जाऊन आमच्या गावात सुरू असलेल्या मटका व जुगारामुळे अनेक तरुण बरबाद होत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थितीही बिघडत चालली आहे. या गैरधंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्था परिस्थितीलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गांभीर्याने दखल घेत गैरधंद्यांवर आळा घाला, असे लेखी निवेदन बेळगाव ग्रामीण पोलिसांना दिले आहे. त्यानंतर पोलिसांनी कसलीच कारवाई केली नाही.
बाची परिसरात सुरू असलेल्या मटका व जुगाराच्या वादातून चाकू हल्ला, गोळीबारासारख्या घटनाही घडल्या आहेत. त्यानंतर तरी पोलीस यंत्रणेला जाग येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बेळगाव शहर व संपूर्ण तालुक्यात मटका, जुगार वाढला आहे. या गैरधंद्यांचा सर्वात मोठा फटका बाची व परिसरातील काही गावांमध्ये बसतो आहे. या परिसरातील सुमारे आठ तरुणांनी 20 ते 25 लाख रुपयांचे कर्ज उचलले आहे. त्यामुळेच स्थानिक नागरिकांना या गैरधंद्यांचे आपल्या परिसरातील दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.
खेळणाऱ्या तरुणांना 10 टक्के व्याजाने पैसे
शिनोळीला लागूनच असलेल्या बाची परिसरात मटका, जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. कधी शिनोळीत तर कधी बाचीत अड्डे बदलत असतात. खेळणाऱ्या तरुणांना 10 टक्के व्याजाने पैसे देणारे सावकारही तेथे असतात. कोणत्याही कागदपत्रांशिवाय लाखो रुपये कर्ज देऊन जुगार व मटका खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. 18 ते 20 वयोगटातील अनेक तरुण या खासगी सावकारांच्या कर्जाच्या फेऱ्यात अडकले आहेत.
कर्जवसुलीसाठी सावकार घरापर्यंत आल्यानंतरच आपल्या मुलाने कर्ज घेतले आहे, हे कुटुंबीयांच्या लक्षात येते. त्यांना धक्काच बसतो. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्याची गरजच काय होती? अशी विचारणा केल्यावरही तरुण समर्पक उत्तरे देत नाहीत. सीमेवर अनेक कारखाने आहेत. बहुसंख्य कामगारांनाही मटका, जुगाराचा नाद लावण्यात आला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन बाची परिसरातील नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मदत मागितली आहे. तरीही पोलिसांची त्यांना मदत मिळत नाही. पोलीस यंत्रणा उलट मटका, जुगाराच्या पाठीशी उभे राहिल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळते.
बाची परिसरातील काही नागरिकांनी ‘तरुण भारत’शी संपर्क साधून मटका व जुगाराच्या नादी लागलेल्या परिसरातील तरुणाईला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. या प्रयत्नांना पोलीस दलाकडून साथ मिळत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. शिनोळी व बाची परिसरातील जुगारी अड्डे काही नवे नाहीत. केवळ बेळगावच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील जुगारी खेळण्यासाठी या परिसरात येत होते. आता स्थानिक तरुणाई गैरधंदेचालकांच्या नादी लागल्यानंतर स्थानिक नागरिकांना जाग आली आहे. आपल्या मुलांना वाचविण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली आहे.
सेल्फीही चर्चेचा विषय
बाची येथील ग्रामस्थ गैरधंदे थांबवण्याची विनंती करण्यासाठी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला पोहोचले. त्यावेळी त्यांचा अर्ज स्वीकारून एका अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत एक सेल्फी काढून घेतली. त्याने काढलेली सेल्फीही चर्चेचा विषय बनला आहे. पंधरा दिवसांपूर्वी लेखी अर्ज देऊनही मटका, जुगार थांबविण्यासाठी काहीच हालचाली न करणाऱ्या अधिकाऱ्याने त्या नागरिकांची सेल्फी कशासाठी काढली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी वेळीच गैरधंदे थोपवण्यासाठी पाऊल उचलले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचाच धोका अधिक आहे. अनेक अधिकारी पोलीस आयुक्तांची दिशाभूल करून आपली महिन्याची कमाई वाढवून घेताना दिसत आहेत. पोलीस दलातील या बेबनावाचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबीयांवर होत आहे.
पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी केलेली कारवाईही वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. 11 नोव्हेंबर 2025 रोजी बेनकनहळ्ळी येथील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून दहा जणांना अटक केली होती. या कारवाईत 53 हजार 600 रुपये जप्त केल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली होती. प्रत्यक्षात ही रक्कम अनेक लाखात होती. या कारवाईबद्दल संशय व्यक्त होताच पोलीस आयुक्तांनी चौकशीचा आदेश दिला होता. बेळगाव येथील अनेक अड्डेचालकांना पोलीस स्थानकाला पोहोचण्याआधीच परस्पर सोडून देण्यासाठी मोठा व्यवहार करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी काय झाली? कोणी दोषी आढळले का? कोणावर कारवाई झाली का? याचा उलगडा चार महिन्यांनंतरही झाला नाही. या कारवाईसंदर्भातही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतरही हे प्रकरण दडपण्यात आले. त्यामुळे पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून बेळगाव ग्रामीण, टिळकवाडी, एपीएमसी, शहापूर आदी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात उघडपणे मटका व जुगारी अड्डे सुरू असल्याचे समजते.