व्यसनी लोक, महिला आयएसआयचे संदेशवाहक
तुरुंगात कैद दहशतवाद्यांना पोहोचतोय संदेश : तपासात समोर आली धक्कादायक माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रण आयएसआयने अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आणि मानसिक स्वरुपात अस्वस्थ लोकांना भारतात पाठविण्याची एक नवी पद्धत अवलंबिली आहे. या लोकांना भारतात घुसवून त्यांचा वापर तुरुंगात कैद दहशतवाद्यांपर्यंत महत्त्वाचा संदेश पोहोचविण्यासाठी केला जातो. जुलै महिन्यापासून आतापर्यंत अशाप्रकारची 10 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. यात पाकिस्तानचे नागरिक किंवा पीओकेतून आलेल्या लोकांना जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या तुरुंगांमध्ये पाठविण्यात आले होते असे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.
हे लोक आयएसआयचे संदेशवाहक असू शकतात, दहशतवाद्यांपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचविण्याचे काम करतात. या लोकांना सुरक्षा दलांपासून वाचण्यासाठी प्रतिरोधाच्या तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण दिले गेल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर आले आहे. या लोकांचे वर्तन संशयास्पद असून त्यांच्याकडून प्राप्त उत्तरांमधून या घुसखोरीमागे मोठा कट असू शकतो असे वाटत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आयएसआयने ही नवी रणनीति अवलंबिली आहे. आयएसआय घुसखोरीच्या रणनीतित महिला आणि अल्पवयीनांचा वापर करते. त्यांना संदेशवाहक म्हणून भारतात पाठविले जात आहे. जुलै महिन्यात पाकिस्तानच्या एका अल्पवयीनाला पंजाबमध्ये पकडण्यात आले होते. त्याची झडती घेण्यात आला असता एक भिजलेला कागद हाती लागला, ज्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिले गेले होते. परंतु तो वाचण्यायोग्य नव्हता.
बीएसएफ तैनातीविषयी माहिती
आयएसआयच्या घुसखोरीच्या रणनीति अमली पदार्थांच्या तस्करीशी देखील जोडलेल्या आहेत. राजस्थानच्या बिजनौर गावातून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली होती. तो मानिसक स्वरुपात अस्वस्थ असल्याचे नाटक करत होता. त्याची कठोर चौकशी केली असता त्याला पाकिस्तानातील दोन ड्रग माफिका सरफराज जोहिया आणि नवाज यांनी भारतात अमली पदार्थांची तस्करी आणि बीएसएफच्या तैनातीविषयी माहिती जमविण्याचे काम दिले होते असे समोर आले.
संदेशवाहकाच्या स्वरुपात वापर
अन्य एका घटनेत पाकिस्तानच्या लाहोर येथून एक युवक मोहम्मद असद स्वत:च्या मोटरसायकलद्वारे भारताच्या सीमेवर पोहोचला असता बीएसएफने त्याला अटक केली होती. प्रेयसीवरून कौटुंबिक वाद झाल्याचा दावा त्याने चौकशीत केला होता. परंतु असद एक संदेशवाहकाच्या स्वरुपात काम करत होता असे अधिकाऱ्यांचे मानण आहे. ऑक्टोबरमध्ये शाहिद इम्रान नावाचा इसम जम्मू सेक्टरमधून भारतात घुसला होता. आपण विवाह करण्यासाठी काली मंदिरात जाऊ इच्छित होतो असा दावा त्याने केला होता. अशाप्रकारच्या घुसखोरांना सर्वसाधारणपणे विदेशींसाठीचा कायदा अणि पासपोर्ट अधिनियमाच्या अंतर्गत अटक केली जाते. याप्रकरणी 2 ते 8 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. मग त्यांना त्यांच्या देशाच्या स्वाधीन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक मदत
1990 च्या दशकाच्या अखेरीस आणि 2000 च्या प्रारंभी आयएसआयने भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावत असलेल्या समझौता एक्स्प्रेसचा वापर करत गोपनीय संदेशवाहक कार्यांसाठी केला होता. आयएसआय अमली पदार्थांची तस्करी आणि जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत प्रदान करण्याचे काम करत होत्sढ. याकरता ज्या व्यक्तींचा वापर केला जायचा ,त्यांना सवारी ऑपरेटर म्हटले जायचे. 2019 मध्ये ही रेल्वेसेवा बंद झाल्याने हा प्रकार थांबला होता.