For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढदिनीच काळाचा घाला

06:44 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाढदिनीच काळाचा घाला
Advertisement

ट्रकच्या धडकेत युवती जागीच ठार, कान्सा-थिवी येथील घटना 

Advertisement

प्रतिनिधी/म्हापसा,थिवी

कान्सा-थिवी येथे ट्रकने ओला इलेक्ट्रिक या स्कूटरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुजाता साळगावकर (वय 26, रा. नास्नोळा-बार्देश) ही युवती ठार झाली, तर अपघातानंतर संशयित ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. जीए-08-टी-5494 क्रमांकाचा ट्रक माडेल ते अस्नोडाच्या दिशेने जात होता तर विऊद्ध दिशेने सुजाता साळगावकर ही जीए-03 -एएक्स- 2254 क्रमांकाच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरवरून येत होती. कान्सा-थिवी येथे भारतीय स्टेट बँकेजवळ संशयित ट्रकचालकाने चुकीच्या दिशेने जात समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ट्रकची धडक बसताच युवती दुचाकीवरून उसळून रस्त्यावर पडली आणि गंभीर जखमी झाली. तिची दुचाकी ट्रकच्या खाली सापडली. जखमीला म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल केले. पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला.

‘त्या’फरारी चालकाचा परवाना रद्द करा : ग्रामस्थांची मागणी

नास्नोळाचे पंचसदस्य गोविंद गडेकर मयताच्या कुटुंबीयांसमवेत कोलवाळ पोलीस स्थानकावर दाखल झाले. जो अपघात झाला तो काळीज हेलावून सोडणारा आहे.  अपघात झाल्यानंतर चालक मुद्दामहून पळाला, सरकारने अशा चालकाचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी पंच सतीश बाप्पा गोवेकर म्हणाले की, ही घटना दु:खदायक आहे. अपघाताला कारणीभूत चालकाला पोलिसांनी त्वरित अटक करून आणावी. खरोखरच हा अपघात झाला की जाणूनबुजून अपघात करण्यात आला हे ग्रामस्थांना कळायला हवे यासाठी सर्व ग्रामस्थ कळंगूट पोलीस स्थानकात थांबले असल्याची माहिती पंचसदस्य गोवेकर यांनी दिली. सर्व कागदपत्रांची पोलिसांनी पडताळणी करावी. मानवतेच्यादृष्टीने मयताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी असे ते म्हणाले. जोपर्यंत ट्रक चालकास अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सुजाताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला.

 वाढदिवसच ठरला काळा दिन

मयत सुजाता साळगावकर हिचा शनिवार दि. 13 एप्रिल रोजी वाढदिवस होता. अखेर वाढदिवसच तिचा काळा दिवस ठरला. ही दु:खद घटना त्यांच्या नास्नोळा येथे कुटुंबियांना कळाल्यावर त्यांनी एकच आक्रोश केला. सध्या तिचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला असून जोपर्यंत फरारी झालेल्या चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

चालकाला रात्री उशिरा अटक

दरम्यान, संशयित चालक प्रमोद सावंत (वय 39, रा. वाळपई) याला कोलवाळ पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.

Advertisement
Tags :

.