विकास दर 6.7 टक्के राहण्याचा एडीबीचा अंदाज
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चालु आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर 6.7 टक्के इतका राहू शकतो, असा अंदाज आशियाई विकास बँकेने (एडीबी)ने नुकताच व्यक्त केला आहे. वाढती देशांतर्गत मागणी, ग्रामीण भागातील लोकांमध्ये उत्पन्नात झालेली वाढ आणि महागाईमध्ये झालेली घसरण या पार्श्वभूमीवर एडीबीने वरील अंदाज व्यक्त केला आहे. पतधोरण समितीकडून रेपो दराबाबत योग्य ते धोरण अवलंबत विकासाला गती देण्याचे काम केले जात आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये पाहता जीडीपी दर 6.8 टक्के इतका राहू शकतो, असेही एडीबीने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेचा अंदाज
तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेनेही जीडीपी दराबाबत आपला अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यांनी आपला अंदाज घटविला आहे. रिझर्व्ह बँकेनुसार भारताचा विकास दर 6.7 टक्क्यांऐवजी 6.5 टक्के राहू शकतो. जागतिक व्यापारातील वाढता तणाव आणि धोरण अनिश्चितता या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने वरील अंदाज वर्तविला आहे. भारताने जागतिक अस्थिरतेच्या स्थितीतही विविध क्षेत्रांमध्ये विकास सुरुच ठेवला आहे. पायाभूत विकासांवर भर दिला जात असून नोकऱ्यांची उपलब्धताही केली जात असल्याने वर उल्लेख केल्याप्रमाणे भारताचा विकास दर 6.7 टक्के राहणार असल्याचे एडीबीने म्हटले आहे.
विकासाला गती मिळेल
नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल करत ती अधिक सोपी केली गेल्यास त्याचा लाभ उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना उठविता येणार आहे. सेवाक्षेत्र आणि कृषीक्षेत्र ही दोन्ही क्षेत्रे सध्याला चांगली कामगिरी बजावत आहेत. हे सगळे मुद्दे भारताच्या विकासाला गतीमान करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत एडीबीने नोंदविले आहे.