आदर्श विद्या मंदिर शहापूरला दुहेरी मुकुट
गोमटेश, पंडित नेहरु संघ विजयी
बेळगाव : जायंटस ग्रुप ऑफ मेन आयोजित जायंटस विकचे औचित्य साधून प्राथमिक-माध्यमिक विभागाच्या मुला-मुलींच्या खो खो व कबड्डी स्पर्धेत आदर्श विद्यामंदिर, गोमटेश हायस्कूल, पंडित नेहरु संघांनी आपपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून विजेतेपद पटकाविले. शहापूर येथील आदर्श मराठी विद्या मंदिर शाळेच्या क्रीडांगणावर आयोजित खो खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, लक्ष्मण शिंदे, अरुण काळे, फेडरेशनचे अधिकारी सुनील मुतगेकर, मुकुंद महागांवकर, विजय नंदीहळ्ळी आदी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धेत 24 संघांनी भाग घेतला होता. खो खो स्पर्धेत प्राथमिक विभागात आदर्श विद्या मंदिर शहापूर अ संघाने विजेतेपद तर आदर्श मराठी ब संघाने उपविजेतेपद पटकाविले.
मुलींच्या विभागात आदर्श विद्या मंदिर विजेतेपद तर मुक्तांगण टिळकवाडी यांनी उपविजेतेपद पटकाविले. माध्यमिक कबड्डी स्पर्धेत गोमटेश हायस्कूल हिंदवाडी संघाने विजेतेपद तर एसकेई शानभाग संघाने उपविजेतेपद पटकाविले. माध्यमिक मुलींच्या गटात पंडित नेहरुने विजेतेपद तर धामणे हायस्कूल धामणेने उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी संघांना प्रमाणपत्र देण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रदीप चव्हाण, शिवराज पाटील, वाय. एन. पाटील, मधू बेळगावकर, राहुल बेलवळकर, जयवंत पाटील, अविनाश पाटील, आनंद कुलकर्णी, मोहन कारेकर, अशोक हलगेकर, विनोद आंबेवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.