गौप्यस्फोट करायला जाऊन अदानी झाले उघड!
शरद पवार यांना रिंगणाच्या मध्यभागी खेचण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्न करायला गेले आणि त्यांची दोरी पडली गौतम अदानींच्या गळ्यात! उद्योगपती अदानी अनपेक्षितरित्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या मैदानात खेचले गेले. 50 खोके, महाराष्ट्राचे उद्योग पळवणे आणि धारावीसह मोठे प्रकल्प एकाच व्यक्तीच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न या विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनीच खरे करून आफत ओढवून घेतली आहे. त्याचे परिणाम मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात काय होतात ते दिसतीलच.
उद्योगपती गौतम अदानी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संबंध महाराष्ट्राला ठाऊक आहेत. पवारांनीही ते नाकारलेले नाहीत हे विशेष. पूर्वीच्या काळी भाजप नेते त्यांसह विविध उद्योगपतींची नावे घेऊन फक्त कुजबूज करायचे. गोपीनाथ मुंडे यांनीही अनेक आरोप केले तरी पवारांच्या मित्र उद्योगपतींची कधी नावे घेतली नाहीत. त्यांना उघड केले नाही. सत्ता चालवायची तर या मंडळींची गरज लागते याची त्यांना, प्रमोद महाजन यांना जाण होती. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आपल्या सत्ताकाळात ते जपले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी गौप्यस्फोट करण्याची आणि त्यासाठी अजितदादांचा उपयोग करण्याची त्यांची खेळी अनपेक्षितरित्या महायुतीला अंगलट आली आहे. अजित पवार यांनी एका बैठकीत पवार, फडणवीस यांच्यासहित गौतम अदानीसुद्धा उपस्थित होते असे वक्तव्य केले. तो तसा मोठाच राजकीय स्फोट होता. कारण, या बैठकीलाच जोडून महाराष्ट्रात 2019 ते 2024 असे सत्तानाट्या घडले आहे. त्यातील गौतम आदानींचा प्रवेश म्हणजे नेपथ्य ढासळून पडद्यामागचा सूत्रधार उघड होण्यासारखेच! उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यामुळे आयतेच कोलीत मिळाले आहे. एकतर अदानी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे ग्रामीण महाराष्ट्रात तर आदित्य ठाकरे मुंबईसह शहरी महाराष्ट्रात रान उठवत आहेत. सरकार महाराष्ट्राची संपत्ती अदानी यांच्या घशात घालत आहे असा त्यांच्या आरोपाचा गाभा आहे. त्यासाठी धारावीच्या विकास प्रकल्पाचा आणि टीडीआर विक्रीतील एकाधिकारशाहीसह सर्वसामान्य मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकलण्याचा दाखला ते देत आहेत. चंद्रपूरमधील सरकारी शाळेची इमारत, पाटगाव येथील धरणाचे पाणी अदानी यांच्या प्रकल्पासाठी दिले जात आहे हे ठाकरे वारंवार सभेमधून सांगत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्वत्र ठाकरे यांच्या मोठ्या सभा होत आहेत. त्यामानाने कोकणातील सभेचा प्रतिसाद मोठा दिसत नाही आहे. ठाकरेंचे आरोप सरकारला नाकारण्याची संधी होती. मात्र अजितदादांची मुलाखत सरकारला महागात पडली. खासदार संजय राऊत यांनी तसेच कॉंग्रेसनेही, “महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या घरी जी बैठक झाली. त्या बैठकीला गौतम अदानी हजर होते. गौतम अदानी, अमित शहा, फडणवीस यांच्या बैठकीत मविआ सरकार पाडण्याचा कट शिजला. तेव्हा कोणाच्या अंगात आलं होतं ते तपासलं पाहिजे. मविआ अडीच वर्षे खूप चांगल्या प्रकारे सत्ता राबवली. परंतु, गौतम अदानींना ते सरकार नको होतं. ही मुंबई त्यांना महाराष्ट्रापासून वेगळी करून बळकवायची आहे. त्यांना मुंबई गिळून टाकायची आहे, असा आरोप करून संधी साधली आहे. उद्योगपतींची दलाली करणारे अशा शब्दात सरकारच्या तीनही नेत्यांचे वर्णन करून अदानींचे आमदार फोडाफोडीसाठी दोन हजार कोटी खर्च झाले. त्या बदल्यात मुंबईतील भूखंड घशात घालून दीड लाख कोटी सरकार मिळवून देईल. शिवाय धारावी पुनर्वसनातून सव्वा लाख कोटीचा टीडीआर घोटाळा होणार आहे. देशाच्या कारभारात अदानींचा हस्तक्षेप या पैशासाठी सुरू आहे असे आरोप विरोधकांनी केले. मतदानाला चार दिवस असताना विरोधक या फुलटॉसचा उपयोग करत आहेत. ‘उद्योगपती सरकारमध्ये हस्तक्षेप करू लागला तर मी त्याला तेथून जायला सांगेन’ असे सांगून शरद पवारांनी स्वत:ची सुटका करून घेतली. अडकले ते शिंदे, फडणवीस, अजितदादा आणि अदानी! या जाळ्यात विरोधक मोदी आणि शहांना ओढू पाहत आहेत.
मोदी आले पण दादा गायब
दादांनी 24 तास उलटायच्या आत खंडन केले. दोन दिवस सलग फडणवीसही तसेच सांगत राहिले. पण दादा बोलले ते खरे असा दुजोरा हसन मुश्रीफ यांनी देऊन नेत्यांना खोटे पाडले. सरकारची गोची झाली. ठाकरेंनी एका सभेत दाऊदशी संबंध असणाऱ्या नवाब मलिक व त्यांच्या मुलीला उमेदवारी देणाऱ्या अजित पवारांना मोदी मुंबईतील सभेत स्टेजवर घेऊन काय बोलणार? असा प्रश्न केला आणि शिवाजी पार्कच्या सभेत अजितदादा किंवा त्यांचा कोणीही प्रतिनिधी दिसला नाही! सत्तापक्ष असा नाईलाजाने विरोधकांच्या नरेटिववर खेळतोय. अजितदादांना आता शरद पवार आठवत असावेत!
पवार पुन्हा पावसात भिजले!
भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, वंचित, मनसे किंवा इतरांचे शरद पवारांबद्दल काहीही मत असले तरी त्यांच्या ज्येष्ठत्वाला आणि नेतृत्वाला दुर्लक्ष करणे, जातीयवादी म्हणून दुसऱ्याकरवी कमी लेखणे याचा परिणाम होत नाही. परिणामी पवारांवर टीका करणारे, पुस्तक लिहिणारे यांचा बाजार संपला आहे. साताऱ्यात निवडणुकीत पवार पावसात भिजले तेव्हा साथीदारच विरोधात होते. पण पुढची पाच वर्षे पवारांनी गाजवली. पवारांची सध्याची लढाई कदाचित त्यांनीच जाहीर केल्याप्रमाणे अंतिम ठरू शकते. अशावेळी लोकांच्या सदिच्छा घेत फिरणे वेगळे, पवार ‘आपण एक स्पष्ट भूमिकेचा महाराष्ट्र लोकांच्या हाती सोपविणार’ असे सांगत आहेत. कोल्हापूर जिह्यात इचलकरंजीच्या सभेत शुक्रवारी ते भिजले. कागलचे मुश्रीफ, वारणेचे कोरे, इचलकरंजीचे आवाडे, जयसिंगपूरचे यड्रावकर हे त्यांचे स्वकिय सध्या दूर आहेत. पुणे ग्रामीणमध्ये पुतण्या अजित दादा यांच्या पुत्रवत वळसे पाटील यांच्या पराभवाचे आवाहन त्यांनी केले आहे. गो. नि. दांडेकरांच्या कथेत शोभावी अशी ही चित्तर कथा आहे. पवारांच्या पावसात भिजण्याने त्यांच्यासह महाराष्ट्रावर काय परिणाम होतो ते पाहणे त्यासाठीच महत्त्वाचे.
महायुतीत वाढता संशयकल्लोळ
सत्ता हातची जाऊ नये म्हणून होणाऱ्या प्रयत्नामुळे महायुतीत गडद बनलेला संशय कल्लोळ आणि पवार, ठाकरेंच्या बाजूने पडलेले फासे त्यांना यशापर्यंत नेतात की नाही हे त्यांच्या शिलेदारांनी स्थानिक पातळीवर कोणाशी हातमिळवणी केली आहे त्यावरून स्पष्ट होईलच. पण, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर विनोद तावडे यांनीही मुख्यमंत्री पदाबाबत आपण इच्छुक नाही. पक्षच नाव निश्चित करेल अशी मते मांडून वाद थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. तावडेंच्या म्हणण्यावर मत विचारता ‘ते राष्ट्रीय नेते आहेत मी राज्याचा नेता’ असे फडणवीस म्हणाले. तर ‘सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांना पाडण्यासाठी भाजपची मदत घ्यायला तयार आहोत’ असे उद्धव ठाकरे म्हणालेत! शेवटच्या क्षणी सामना रोमांचक वळणावर चाललाय!
. शिवराज काटकर