एम्मार इंडिया अधिग्रहणासाठी अदानी समूह उत्सुक
वृत्तसंस्था/मुंबई
अदानी समूह बांधकाम क्षेत्रातील कंपनी एम्मार इंडिया खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी समूह बांधकाम क्षेत्रातील कंपनी एम्मार इंडिया 1.4 ते 1.5 अब्ज डॉलर्सना खरेदी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मूळच्या दुबईमध्ये असणाऱ्या या कंपनीने भारतीय बांधकाम क्षेत्रामध्ये 2005 मध्ये भारतातील एमजीएफ डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत संयुक्त भागीदारीतून प्रवेश केला होता. एम्मार इंडिया यांनी 2016 मध्ये एमजीएफ बरोबरचा करार संपुष्टात आणला.
कंपनीचा विस्तार
दिल्ली-एनसीआर, मुंबई, मोहाली, लखनऊ, इंदोर आणि जयपूर या ठिकाणी रहिवासी प्रकल्पांसह व्यावसायिक प्रकल्पांसाठीच्या जागा कंपनीकडे आहेत. अदानी समूह आणि एम्मार इंडिया यांच्यामध्ये प्राथमिक स्तरावरती चर्चा सुरू असल्याचेही समजते. अदानी समूहाचा बांधकाम क्षेत्रामध्ये सहभाग हा अदानी रियल्टी आणि अदानी प्रॉपर्टीज या माध्यमातून दिसून येतो. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये या अंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत.