अदानी गटाच्या कंपनीची चौकशी होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स बनविणाऱ्या, अदानी गटाच्या एका कंपनीवर करचोरी केल्याचा आरोप असून भारत सरकार याची चौकशी करणार आहे. अदानी उद्योगसमूहाची सर्वात महत्वाची कंपनी असणाऱ्या अदानी एंटरप्रायझेस या कंपनीची ही संरक्षण साधने बनविणारी उपकंपनी आहे. क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या काही साधनांवरील आयात शुल्क या कंपनीने चुकविले आहे, असा आरोप आहे.
ही उपकंपनी अदानी डिफेन्स अँड टेक्नॉलॉजीज या नावाने परिचित आहे. ही कंपनी भारतासाठी छोटी शस्त्रास्त्रे निर्माण करते. या शस्त्रास्त्रांचा उपयोग भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात चालविलेल्या ‘सिंदूर’ अभियानात यशस्वीरित्या करण्यात आला होता. या कारवाईत अदानी गटाने बनविलेले ड्रोन्स प्रभावी ठरलेले होते. राजस्व गुप्तचर संस्था प्राधिकरणाकडून गेल्या मार्चपासून अदानी गटाच्या या कंपनीची चौकशी केली जात आहे. या चौकशीला आता वेग प्राप्त झाला आहे. अदानी गटाने आरोप नाकारले आहेत. या गटाने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स बनविण्यासाठी लागणाऱ्या साधनांची आयात करताना जवळपास 60 कोटी रुपयांचे आयात शुल्क चुकविल्याचा आरोप प्राधिकरणाने ठेवलेला आहे.
अदानींकडून कराराची माहिती
या आरोपांच्या पार्श्वभूभीवर अदानी गटाच्या एका प्रवक्त्याने क्षेपणास्त्र पुरवठ्यासंबंधातील एका महत्वाच्या कराराची माहिती पत्रकारांना दिली आहे. या कराराचा भाग म्हणून ग्राहकाने आयात शुल्क मुक्तीचे अनुमती पत्र सादर केले आहे. त्यामुळे शुल्क भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळे आपल्या कंपनीने कोणताही नियमभंग केलेला नसून करचोरीही केलेली नाही, असे स्पष्टीकरण अदानी गटाच्या एका महत्वाच्या प्रवक्त्याने पत्रकारांशी बोलताना केले आहे.