अदानी ग्रीनला मिळाले ऊर्जा वितरणाचे कंत्राट
वृत्तसंस्था/ मुंबई
अदानी समूहातील कंपनी अदानी ग्रीन एनर्जी यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून ऊर्जा वितरणाचे कंत्राट प्राप्त झाले. या कंत्राटांतर्गत अदानी ग्रीन एनर्जी 6600 मेगावॅट नूतनीकरणयुक्त व औष्णिक ऊर्जा वितरण करणार आहेत. ही माहिती समूहाने शेअरबाजाराला दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या राज्य वीज वितरण कंपनीसोबत नव्या कंत्राटा संदर्भात कंपनीने करार करणार असल्याचे म्हटले आहे. हा करार 25 वर्षांसाठी असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कंत्राटांतर्गत 1600 मेगावॅटची औष्णिक ऊर्जा आणि 5000 मेगावॅटची सौर ऊर्जा याचे कंत्राट कंपनीला मिळाले. औष्णिक ऊर्जा क्षेत्रामध्ये अदानी पॉवर ही जगातील सर्वात मोठी निर्मिती कंपनी मानली जाते. नूतनीकरणयुक्त सौर उर्जेचे वितरणही कंपनी करते. सदरच्या कंत्राटासाठी विविध कंपन्यांकडून बोली मागविण्यात आली होती. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जीला अखेर कंत्राट प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले आहे. हे कंत्राट किती किंमतीला झाले, याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही.