अदानी एनर्जीला 2800 कोटीचे कंत्राट
ऊर्जा वितरणाचे करणार काम : समभाग चमकला
अहमदाबाद :
अदानी समूहातील कंपनी अदानी एनर्जी सोल्युशन्स यांना अलीकडे 2800 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले आहे. या बातमीनंतर कंपनीचा समभाग 3 टक्के इतका वाढलेला दिसून आला.
मिळालेल्या माहितीनुसार अदानी एनर्जी सोल्युशन्सला ऊर्जा वितरणाचा प्रकल्प मिळाला असून हे 2800 कोटी रुपयांचे कंत्राट असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी ही घोषणा होताच कंपनीचे समभाग 3 टक्के इतके वाढले होते. शुक्रवारी बाजार बंद होताना समभाग 1.83 टक्के इतका वाढत 830 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या पाच दिवसांमध्ये पाहता कंपनीचा समभाग 5 टक्के इतका वाढला असून महिन्यामध्ये जवळपास 24 टक्के इतकी वाढ कंपनीच्या समभागाने नोंदवली आहे.
36 महिन्यांचा कालावधी
गुजरातमधील ऊर्जा वितरणाचा प्रकल्प अदानी एनर्जी सोल्युशन्सला मिळाला असून या प्रकल्पाचे काम कंपनीला 36 महिन्यांमध्ये पूर्ण करायचे आहे. प्रकल्पामध्ये दोन मोठे ट्रान्सफॉर्मर जोडण्याची जबाबदारी कंपनीवर असणार आहे. मुंद्रामध्ये हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया निर्मितीसाठी ग्रीन इलेक्ट्रॉनच्या पुरवठ्याचे काम कंपनीला करावे लागणार आहे. आर्थिक वर्षामध्ये कंपनीकडे एकंदर 57561 कोटी रुपयांच्या कामाची ऑर्डर आहे.