For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅडम झम्पाचा प्रहार, गतविजेत्या इंग्लंडची हार

06:34 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅडम झम्पाचा प्रहार   गतविजेत्या इंग्लंडची हार
Advertisement

ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी विजय : इंग्लंडवर वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचे संकट

Advertisement

वृत्तसंस्था/ बार्बाडोस, वेस्ट इंडिज

शनिवारी रात्री बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या सामन्यात फिरकीपटू अॅडम झम्पाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर कांगारूंनी इंग्लंडवर 36 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह सुपर-8 मध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा आणखी बळकट झाल्या आहेत. तर इंग्लंडला अद्याप एकही विजय नोंदवता आलेला नाही. स्कॉटलंडविरुद्धचा त्यांचा पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता. आता पुढील फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला आपले उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.  कांगारूंनी प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावत 201 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 6 बाद 165 धावापर्यंत मजल मारता आली.

Advertisement

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 गडी गमावून 201 धावा केल्या. विशेष म्हणजे, या वर्ल्डकपमध्ये प्रथमच 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकवता आलं नाही, डेव्हिड वॉर्नर 39, ट्रॅव्हिस हेड 34, मिशेल मार्श 35 आणि मार्कस स्टॉयनिस 30, ग्लेन मॅक्सवेलने 28 धावांचं योगदान दिले. टीम डेविडने 11 तर मॅथ्यू वेडने नाबाद 17 धावा केल्या.

गतविजेत्यांची हार

202 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार सुरुवात केली होती. कर्णधार जोस बटलरने आपल्या तडाखेबंद शैलीत 28 चेंडूत 42 धावा ठोकल्या. तर फिल सॉल्टने त्याला उत्तम साथ देत 23 चेंडूत 37 धावा केल्या. दोघांनी 42 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. मात्र अॅडम झम्पाने या दोन्ही फलंदाजांना बाद केले. या दोघांना बाद केल्यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीला ऑस्ट्रेलियन गोलंदाजानी डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे इंग्लंडला 20 षटकांत 6 बाद 165 धावापर्यंत मजल मारता आली. झम्पाने 4 षटकात 28 धावा देत या दोघांचे बळी घेतले. या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकात 7 बाद 201 (ट्रेव्हिस हेड 34, वॉर्नर 39, मिचेल मार्श 35, मॅक्सवेल 28, ख्रिस जॉर्डन 2 तर मोईन अली, आर्चर, आदिल रशीद व लिव्हिंगस्टोन प्रत्येकी एक बळी).

इंग्लंड 20 षटकांत 6 बाद 165 (फिल सॉल्ट 37, जोस बटलर 42, मोईन अली 25, ब्रुक 20, अॅडम झम्पा व पॅट कमिन्स प्रत्येकी दोन बळी).

17 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा पराभव

ब्रिजटाऊन येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. टी-20 विश्वचषकात 17 वर्षांनंतर इंग्लंडला नमविण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाने नोंदविला. याआधी 2007 च्या पहिल्या वहिल्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने केपटाऊन येथे इंग्लंडला नमवले होते.

Advertisement
Tags :

.